पर्यावरण
मिलद बेंडाळे
हवामानबदलाचे खोलवर सामाजिक परिणाम सध्या पहायला मिळत आहेत. चक्रीवादळ, पूर आणि इतर आपत्तींमुळे महिलांवरील हिंसाचार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आर्थिक असुरक्षितता आणि कौटुंबिक दबावामुळे लवकर लग्न होण्याचे धोकेही वाढत आहेत. यामुळे महिलांच्या अधिकारांना गंभीर धोका पोहोचतोच, पण त्यांचे आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक स्थितीवरही गंभीर परिणाम होत आहे.
हवामानबदलामुळे प्रभावित देशांमध्ये महिलांवरील हिंसाचार खरोखरच वाढत आहे का, या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे आहे. लंडन विद्यापीठातील संशोधकांचे एक संशोधन ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. हवामानबदलामुळे प्रभावित देशांमध्ये महिलांवरील हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. या संशोधनात वादळ, भूस्खलन आणि पूर यासारख्या हवामानसंबंधित विविध घटनांनंतर महिलांवरील भागीदार हिंसाचाराच्या प्रकरणांचे विश्लेषण करण्यात आले. या संशोधनात डेटा म्हणून 1993 ते वर्ष 2019 दरम्यान 156 देशांमधील अत्याचारग्रस्त महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासाने गेल्या एका वर्षात होणारी शारीरिक किंवा लैंगिक हिंसा अशी पती-पत्नीमधील हिंसाचाराची व्याख्या केली आहे. याव्यतिरिक्त, त्याच अभ्यासात संशोधकांनी 190 देशांमध्ये 1920 ते 2022 पर्यंतचा हवामान डेटा गोळा केला आणि हवामानातील बदलांमुले होणारी हिंसा तसेच देशांच्या आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण केले. हे संशोधन करणाऱ्या सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञ सारा म्हणाल्या, ‘आपण हवामानबदलाच्या परिणामांचा विचार करतो, तेव्हा काही कठोर गोष्टी आठवतात; पण हवामानबदलाचे काही लपलेले परिणामही आहेत, जे सहजासहजी दिसत नाहीत किंवा त्यांचा सहज अभ्यास करता येत नाही. यामध्ये लिंग-आधारित हिंसाचाराचा समावेश आहे. हवामान बदलामुळे प्रभावित देशांमध्ये महिलांवरील अत्याचार वाढत आहेत.’
हवामानबदलामुळे लोकांमध्ये असमानता वाढते. या संशोधनानुसार आर्थिक समस्या, सामाजिक अस्थिरता, वाईट वातावरण आणि तणाव यासारखी परिस्थिती हिंसाचाराला प्रोत्साहन देते. याच अभ्यासातून असेही दिसून आले आहे की चक्रीवादळ कॅटरिनानंतर नवीन मातांना पुरुषांकडून मारहाण होण्याचा धोका आठपट वाढला होता. या अहवालाशिवाय उप-सहारा आफ्रिकेशी संबंधित पाच संशोधनामधून असे आढळून आले आहे, की दुष्काळात शारीरिक अत्याचार, बालविवाह, हुंडाबळी, स्त्रीहत्या या घटनांमध्येही वाढ झाली आहे. जास्त जीडीपी असलेल्या देशांमध्ये हिंसाचार कमी आहे. लंडन विद्यापीठात झालेल्या अशाच अभ्यासातून असेही समोर आले आहे की सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) जास्त असलेल्या देशांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी आहे. संशोधकांच्या मते विद्यमान डेटा दर्शवतो की एखादी स्त्री हवामानाशी संबंधित घटनांना तोंड देते, तेव्हा काही देशांमध्ये हिंसाचाराला बळी पडण्याची शक्यता वाढते, तर इतर देशांमध्ये असे होत नाही. संशोधकांनी हेदेखील स्पष्ट केले, की त्यांचा उद्देश राष्ट्रीय स्तरावर काय घडत आहे हे समजून घेणे आहे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय हवामानबदल धोरणांची अधिक चांगल्या प्रकारे माहिती देता येईल.
असे असले तरी संशोधक हे ठरवू शकलेले नाहीत की भिन्न हवामान घटनांचा भागीदार हिंसाचारावर भिन्न परिणाम का होतो. त्यांचा विश्वास आहे की हिंसेवर वेगवेगळ्या समस्यांचा प्रभाव वेगवेगळ्या वेळी दिसू शकतो आणि डेटाच्या अभावामुळे दोन वर्षांच्या अभ्यास कालावधीत या पैलूचा समावेश करता आला नाही. त्यामुळे महिलांवरील हिंसाचाराशी संबंधित डेटा नियमित गोळा करण्याचे आवाहन संशोधक विविध देशांना करत आहेत. संशोधकांनी असेही सांगितले की काही पुरावे हेदेखील दर्शवतात की उष्ण आणि सौम्य हवामानात हिंसा आणि आक्रमक वर्तन वाढू शकते. हवामानाच्या आपत्तींमुळे कुटुंबांमध्ये तणाव आणि अन्न असुरक्षितता वाढते. त्यामुळे हिंसा वाढू शकते. हवामान बदलामुळे प्रभावित देशांमध्ये महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. हवामानबदलामुळे कृषी उत्पादन घटणे, अन्न असुरक्षितता, महिलांवरील हिंसाचार अशा आर्थिक समस्या, वाढतात. कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खराब असते, तेव्हा घरात तणाव निर्माण होतो, जो अनेकदा घरगुती हिंसाचाराच्या रूपात प्रकट होतो. पारंपारिकपणे घरगुती कामे आणि मुलांची काळजी घेणाऱ्या स्त्रिया अशा काळात अधिक असुरक्षित असतात. काही देशांमध्ये पितृसत्ताक संरचना स्त्रियांवरील हिंसाचार सामान्य करते. हवामानबदलामुळे सामाजिक अस्थिरता वाढते, तेव्हा लिंगआधारित हिंसाचाराला प्रोत्साहन देते. पारंपारिक लिंगआधारीत भूमिका प्रचलित असणाऱ्या ठिकाणी महिलांच्या हक्कांचा आदर केला जात नाही. अशा समुदायांमध्ये स्त्रिया अधिक असुरक्षित असतात.
एका अभ्यासात असे दिसून आले आहे, की उष्णता आणि आर्द्रतेमुळे हिंसा आणि आक्रमकता वाढते. कुटुंबे संकटात असतात, तेव्हा अनेकदा हिंसाचाराचा अवलंब केला जातो आणि स्त्रिया या परिस्थितीला सर्वाधिक बळी पडतात. महिलांसाठी आर्थिक संधींना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि हिंसाचाराच्या विरोधात अधिक सक्षम होतील. महिला आणि मुलींसाठी शैक्षणिक संधी वाढवणे महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे महिलांना आपल्या हक्कांची जाणीव होते. ती त्यांना सक्षम बनवते. महिलांना मदत मिळावी यासाठी पोलिस, आरोग्य सेवा आणि इतर सामाजिक सेवांची उपलब्धता वाढवणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेष सेवांची उपलब्धता सुनिश्चित केली पाहिजे. महिलांच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवणारे आणि सामाजिक कलंक कमी करणारे कार्यक्रम स्थानिक समुदायांमध्ये चालवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या समस्येचे निराकरण केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आवश्यक आहे. हवामानबदल ही जागतिक समस्या आहे आणि त्याचे परिणाम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज आहे. हवामानबदलाशी संबंधित धोरणांमध्ये देशांनी लिंग-आधारित दृष्टिकोन समाविष्ट केले पाहिजेत.
संशोधकांनी राष्ट्रीय स्तरावर काय घडत आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून आंतरराष्ट्रीय हवामानबदल धोरणाची माहिती मिळण्यास मदत होईल, हा उद्देश होता. वेगवेगळ्या हवामानबदल घटनांचा महिलांवर कौटुंबिक हिंसाचार वाढण्यात परिणाम होतो, की नाही, हे मात्र त्यांना बार्काईने तपासता आले नाही. डेटा उपलब्धतेच्या अभावामुळे अभ्यास केलेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये ते त्यांना सिद्ध करता आले नाही. यामुळे संशोधकांनी महिलांवरील हिंसाचाराच्या उपायांवर अधिक नियमितपणे डेटा गोळा करण्यासाठी देशांना आवाहन केले. काही पुरावे सूचित करतात की, उष्णता आणि आर्द्रता हिंसक घटनांसह आक्रमक वर्तन वाढवते. संशोधकांनी अभ्यासात म्हटले आहे की हवामानसंबंधित आपत्तींमुळे कुटुंबांमध्ये तणाव आणि अन्न असुरक्षितता वाढते. त्यामुळे हिंसाचार वाढू शकतो.
हिंसाचाराचा सामना करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सामाजिक सेवांवरही याचा अनेकदा परिणाम होतो. जसे की पोलिस आणि नागरी समाज, जे संकटावर अधिक लक्ष केंद्रित करतात. त्याच वेळी, लैंगिक हिंसाचाराच्या जोखमींचा विचार न करता सरकार आपत्ती निवारण आश्रयस्थान तयार करू शकते. पितृसत्ताक पध्दती, नियम असलेल्या आणि स्त्रियांवरील हिंसाचाराचा वापर सामान्य वर्तन म्हणून स्वीकारला जातो, अशा देशांमध्ये हे सर्व अधिक वारंवार आणि अधिक गंभीरपणे घडते. संशोधकांचा विश्वास आहे की हवामानशमन आणि अनुकूलन प्रयत्न महिलांवरील हिंसाचार कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. यामध्ये देशांच्या हवामानबदलाच्या ठरावांमध्ये ‘महिलांवरील हिंसाचार’ या संज्ञेचा उल्लेख करणे आणि त्याचा सामना करण्यासाठी निधीचे वाटप करणे किंवा हवामानबदल, लिंग कृती योजना विकसित करणे यासारखे राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेले योगदान समाविष्ट असू शकते. संशोधनानुसार, सामोआ आणि फिजी या दोन देशांनी हे आधीच केले आहे. देशांच्या आपत्ती नियोजन प्रक्रियेत महिलांवरील हिंसाचाराचा विचार केला जावा, अशी शिफारस करण्यासाठी संशोधकांनी संशोधनाचा संदर्भ दिला.
(अद्वैत फीचर्स)
