बीड: मराठा समाजाने आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत पाडावे, असा आदेश जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर आज त्यांनी आता एक मराठा लाख मराठा सिध्द करण्यासाठी एक लाख मराठ्यांसह आरक्षणासह उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. जागतिक पातळीवर अशा स्वरुपाचे हे पहीलेच उपोषण ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारपासून बीड जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केलीय. मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीमध्ये आज येथील गेवराईमध्ये समर्थकाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास्थळी मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली.
या उपोषणाला येत असताना समाज बांधवांनी आपल्याला आवश्यक असणारे सर्व साहित्य घेऊन यावे, तसेच विशेष करून येत असताना अंथरणे व पांघरण्यासाठी कपडे देखील घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारची झोप उडवण्यासाठी आता मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे. यांना मराठा समाजाचा काय हिसका आहे ते दाखवूनच देऊ, उपोषणासारखी ताकद कोणत्याही आंदोलनामध्ये नाही. एक लाख समाज बांधव उपोषणाला बसल्यानंतर किती डॉक्टर त्यांना लागतील हे सांगता येत नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.
गेवराईमध्ये उभारण्यात आलेल्या संपर्क कार्यालयातून अन्याय होणाऱ्या लोकांना न्याय मिळणार असल्याचा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. विधानसभा निवडणुका लागल्या आहेत. कोणाला पडायचं आणि कुणाला आणायचं हे तुम्हीच ठरवायचं आहे. तर ज्यांनी उपोषणाला विरोध केला त्यांना असे पाडा की पुन्हा पाच पिढ्या उभा राहिले नाही पाहिजेत. या गेवराई मतदारसंघातून मी एकच सांगतो की आपल्याला निवडणुकीचे काही देणे घेणे नाही. मात्र ज्यांनी आरक्षणाला विरोध केलाय त्यांनी समाजाला विरोध केलाय त्यांना पाडा. बॉण्ड लिहून घ्या अथवा नका लिहून घेऊ, मात्र सर्वांचा विचार करा आणि एक गठ्ठा मतदान करा. असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केलं.