२० नोंव्हेंबर समोरच आहे. मतदान यंत्रावरील आपल्याला हव्या त्या, (आपल्या लाडक्या) पक्षचिन्हा समोरचे बटण दाबण्यासाठी अवघे दहा दिवस उरले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतील मतदानाची वेळ जवळ येत असताना, कोण जिंकणार याचे कुतुहल सहाजिकच वाढले आहे. देशातील आणि राज्यातील सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात धावत आहेत. वातावरण तापवत आहेत. विविध वृत्तवाहिन्यांवरून नेत्यांच्या मुलाखींच्या तोफाही धडाडत आहेत. राज्यातील जे काही नेते हे विचित्र आणि सूचक विधाने करण्यासाठी ख्यातकीर्त आहेत, त्यात शरद पवारांचे नाव अग्रभागी ठेवावेच लागेल. वयाच्या 84व्या वर्षीही हा माणूस दररोज सकाळी सहा पासून कामाला सुरुवात करतो. त्यांच्या वयाची मंडळी खरेतर घरी बसून येणाऱ्या जाणाऱ्यांना चार गोष्टी सुनावण्यातच धन्यता मानत असतात. पण पवार साहेब हे आजही दिवसाला तीन तीन सभा घेत ऊन्हा तान्हात हिंडत आहेत. यातील बारातीलमधील सभेतील त्यांचे भाषण आणि नांदेडला त्यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेली मुलाखत यामुळे जनतेला मात्र आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांचे मित्रपक्षही चक्रावून गेले आहेत. बारामतीत पवार साहेबांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत तर नांदेडमध्ये त्यांनी थेट महायुतीचे पारडे थोडे जडच असल्याचे सूचित केले आहे.
शरद पवार निवृत्त होणार यात फारसे आश्चर्याचे कारण नाही. आज ना उद्या हे अपेक्षितच आहे. पण असे विधान निवडणुकीच्या प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत यावे याचे आश्चर्य नक्कीच आहे. पवार थकलेले नाहीत. फक्त त्यांना जडलेल्या भीषण आजारानंतर त्यांचे बोलणे समजायला थोडं जड जाते. शब्दांचे उच्चार पुरेसे स्पष्ट येत नाहीत.
सभेत बसलेल्या जनतेला त्यांचे भाषण समजत असले तरी टीव्हीच्या पडद्या पुढे बसलेल्या राज्याच्या अन्य भागांतील जनतेला त्यांचे भाषण समजून घेणे जड जाते. फार कान देऊन ऐकावे लागते. एआय तंत्रज्ञाने आता अशी सोय करून दिली आहे की नेता बोलत असताना त्यांचे भाषण टीव्हीच्या पडद्यावर खाली लगेच जसेच्या तसे लिहून येऊ शकते. तशा तंत्राचा वापर करून वृत्तवाहिन्या अनेक वेळा शरद पवारांच्या मुलाखती व भाषणांची लिखित वाक्येही पडद्यावर सोबतच दाखवतात. परवाच्या भाषणातून, कुठेतरी आता थांबावे, असे स्वतः साहेबांनाही वाटते आहे आहे, हे बारामतीकरांच्या ध्यानी आले. पण, “साहेबांनी पक्षाची सारी पदे सोडून दिली, ते प्रचारातूनही बाजूला झाले, असे खरेच घडले तर ?” या कल्पनेने त्यांच्या समर्थकांच्या पोटात नक्कीच गोळा आला असेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे ज्या पक्षाचे नाव आहे, त्यातून शरद पवार वजा झाले तर उरेल काय ?! जयंत पाटील, राजेश टोपे, सुप्रिया सुळे, जीतेंद्र आव्हाड असे काही त्यांचे बिनीचे शिलेदार आहेत खरे, पण, “पवारांच्या निवृत्ती नंतर पक्षाचे कार्यकर्ते टिकून राहतील का ? पक्षाची वाढ अलिकडे सहा महिन्यांत, लोकसभा निकाला नंतर, ज्या जोमाने झाली, तो जोम व तो जोश पुढे टिकेल का ?” असा लाख मोलाचा सवाल कार्यकर्त्यांना पडला असेल आणि जर पवारसाहेब स्वतः निवृत्तीचा विचार करत असतील तर, जनतेने त्या पक्षाच्या उमेदवारांना मते द्यायची ती तरी कोणाकडे बघून, हाही सवाल त्या पाठोपाठच येतो. त्यामुळेच ऐन निवडणुकीच्या धामधुमीत साहेबांनी निवृत्तीची अन् निरवा निरवीची भाषा करणे, म्हणजेच रा.काँ.श.प.च्या मतपेटीला गळती लागण्या सारखेच आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे जा काही पंचाऐशी उमेदवार ठिकठिकाणी उभे आहेत त्यांना धाबे दाणाणल्या सारखे वाटत असेल तर, ते चूक नक्कीच म्हणता येणार नाही.
शरद पवार साहेबांचे दुसरे गंमतीदार व गूढ विधान आहे, ते महायुतीच्या योजनांबद्दल. त्या विधानाने मतदानावर थेट परिणाम होण्याची शक्यता वाढते आहे. लोकसभा निवडणुकी आधी शरद पवारांनी असाच प्रकारे इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटले होते की “नंतर काँग्रेसमध्ये बरेच लहान प्रादेशिक पक्ष विलीन होऊ शकतील…!” लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये, पुन्हा एकदा, विलीन करून टाकणार आहेत की काय ? अशा चर्चा पुढे दोन तीन दिवस जोरात झडल्या.
नंतर साहेबांनी खुलासा केला की, “माझा पक्ष विलीन करणार असे मी म्हटलेच नव्हते, काही प्रादेशिक पक्ष निवकाला नंतर राहुल गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, इतकेच माझे म्हणणे होते”. अर्थातच पवारांना वाटले होते तितक्या भक्कम जागा काही काँग्रेसला त्या निवडणुकीत मिळाल्या नाहीत. खासदार संख्येची शंभरीही काँग्रेसला गाठता आली नाही. परिणामी काँग्रेसमध्ये परत विलीन करण्याची भाषा आता कोणीच बोलत नाही. शिवाय हरयाणाच्या निकालानंतर तशा शक्यता पूर्णतः विरून गेल्या आहेत.
आता विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला मोजकेच दिवस शिल्लक राहिले असताना, पवारांचे दुसरे तसेच विधान आले आहे व ते आहे, लाडकी बहीण योजने विषयी. इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरदराव म्हणाले की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीन्ही पक्षांना – रा.काँ.श.प., काँग्रेस आणि सेना-उबाठा – यांना जो चढता आलेख लाभला होता तो आता तितकासा उरलेला नाही.
लोकसभे आधी भाजपाचा चारशे पारचा जो नारा होता त्यावरून दलित मतदार अस्वस्थ होता. संविधान बदलले जाणार, याची साधार भीती लोकांना वाटत होती. मुस्लीम समुदायाबद्दलची मोदी सरकारची धोरणे, त्या मसाजाला स्वस्थ करणारी ठरली होती. परिणामी मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समुदाय मोदींच्या विरोधात मतदान करून गेला. त्याचा लाभ तसेच मोदींना बदललले पाहिजे ही जनभावना महाविकास आघाडीच्या पाठीशी होती. त्यामुळेच राज्यातील 48 पैकी तब्बल 30 जागी मविआचे तर सांगतील अपक्ष (काँग्रेस बंडखोर) असे 31 खासदार भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी या महायुतीच्या विरोधात निवडून गेले. उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच हरयणातही मोदींच्या मागे असणारी खासदारांची संख्या घटली. पण शरदराव सांगतात की महाराष्ट्रात आत स्थिती तशी उरलेली नाही.
लोकसभा निकाला नंतर राज्य सरकारने अनेक निर्णय केले आहेत. विविध समाज घटकांना, तरुणांना, शेतकऱ्यांना थेट पैसे देणाऱ्या अनेक योजना राबवल्या आहेत. तसेच लाडकी बहीण योजना आणली आहे. माझे सहकारी सांगतात की लाडकी बहीणीचा बराच परिणाम मतदारसंघांमध्ये जाणवतो आहे. महायुतीला वातावरण सध्या थोडेफार अनुकूल झाले आहे, असेच शरद पवारांनी सुचवले आहे.
अर्थाताच सतत सावधपणा त्याचेच नाव शरद पवार ! त्यामुळे त्यांनी त्याच मुलाखतीत पुढे असेही सांगून ठेवले आहे की तरीही जनतेला बदल हवा आहे, असे माझे मत आहे. मी प्रवास करताना वाटेत मुद्दा एका शेतापाशी थांबून काम करणाऱ्या महिलांना विचारले की सरकारी योजनेचे (लाडकी बहीण) पैसे मिळतात का, त्यांचे उत्तर होकारार्थी आले. पण पुढे या शेतकरी महिला असेही म्हणाल्या की सरकार एका हाताने देतंय व दुसऱ्या हाताने काढूनही घेतंय. सर्वच गोष्टींची महागाई वाढली आहे. ही राज्याची भावना मला दिसते. त्यामुळे महाविकास आघाडीला आजही चांगली संधी आहे असे मत पवारांनी व्यक्त केले आहे. मात्र मुख्यमंत्री कोण हे आपण आत्ताच ठरवणार नाही. जेंव्हा निकाल लागेल व मविआला बहुमत मिळेल तेंव्हा सर्वात मोठा जो पक्ष राहील त्याला आम्ही पाठिंबा देऊ असेही साहेब म्हणतात. त्यांच्या मनात मुख्यमंत्रीपदापेक्षा आपल्याला विरोधी पक्ष नेता निवडावा लागेल असा विचार तरळत असेल काय ? संशय घेण्या सारखेच हे वक्तव्य आहे खरे…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *