तहसीलदारांनी बजावली स्वामित्व शुल्क भरण्याची नोटीस
ग्रामसेवकाचा नो रिस्पॉन्स!
योगेश चांदेकर
पालघरः डहाणू तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायत खुट खाडी येथील पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम करीत असून, या कामासाठी समुद्राची वाळू उचलण्यात आली. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तसेच स्वामित्व परवानगी व शुल्क न भरता ही वाळू उचलण्यात आल्याने तहसीलदारांनी या ग्रामपंचायतीला तसेच सरपंचांना बाजारभावाच्या पाचपट दंड भरण्याची नोटीस बजावली आहे.
ग्रामपंचायत अथवा स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या कामासाठी वाळू, मुरूम, दगड आदी वापरायचे असेल, तर त्याचे स्वामित्व शुल्क भरणे आवश्यक असते तसेच लिलावात भाग घेऊन वाळू उचलता येते. बोर्डी ही ग्रामपंचायत समुद्रकिनारी आहे. येथे अतिशय शांत, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आहे. बोर्डी हे चित्रपट शूटिंगसाठी तसेच पर्यटकांसाठी ही महत्त्वाचे ठिकाण आहे.
पर्यटकांच्या गर्दीच्या ठिकाणाहूनच वाळू तस्करी
बोर्डीचा स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत असतात. अशा पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी पर्यटक येतात, तेथील समुद्र किनाऱ्या वरील, बोर्डी ग्रामपंचायतीने वाळू उचलली. तिथे समुद्रात मोठा खड्डा केला. हा खड्डा जीवघेणा ठरू शकतो. याबाबत सामाजिक कार्यकर्ते कल्पेश जोगमेरकर यांनी बोर्डी ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी, मंडल अधिकारी आदींकडे तक्रार केली; परंतु, त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही.
किनाऱ्या वरील पाडण्यात आलेले खड्डे पुरावे
समुद्र किनाऱ्या वरील काढण्यात आलेली, वाळु मुळें झालेले खड्डयाचे
पुरावे तसेच बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या वाळू साठ्याची छायाचित्रे जोगमेरकर यांनी अखेर तहसीलदार सुनील कोळी यांना पाठवली, आणि त्यासंबंधीची तक्रारही केली. त्यानंतर ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून त्याचा पंचनामा केला. ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार बोर्डी येथे ग्रामपंचायत खुटखाडी पुलाखाली संरक्षण भिंत बांधत आहे, त्या बांधकामासाठी बोर्डी ग्रामपंचायत समुद्रातील वाळू वापरत असून या ठिकाणी अंदाजे दोन ब्रास वाळूचा साठा आढळला आहे.
तहसीलदारांचा कारवाईचा इशारा
दरम्यान ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर तहसीलदारांनी ग्रामपंचायतला दंडात्मक कारवाई बाबतची, नोटीस बजावली आहे. ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी ६ तारखेला दिलेल्या अहवालानुसार बोर्डी ग्रामपंचायतच्या खुटखाडी येथील पुलाखालील संरक्षण भिंतीच्या कामासाठी समुद्राची वाळू उचलली असून, या ठिकाणी अंदाजे दोन ब्रास वाळूचा साठा आढळून आलेला आहे. या बाबत, बोर्डी ग्रामपंचायतीच्या, विरुद्ध दंडनीय कारवाई करून,सदर गौण खनिजनिजाची दंडाची रक्कम ही नोटीस मिळाले पासून,७ दिवसाच्या आंत तात्काळ शासन जमा करण्यात यावी, अन्यथा आपले विरुद्ध अनाधिकृत, गौणखनिज उत्खनन केल्या बाबत फौजदारी गुन्हा दाखल करून, पुढील कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे नमूद केले आहे अशी नोटीस ग्रामपंचायत बोर्डी व सरपंचांना पाठवण्यात आली आहे. या संदर्भात बोर्डी ग्रामपंचायतीस, दंडनीय कारवाई पात्र असल्याने, बोर्डी ग्रामपंचायतीस, दंड भरण्यास, बाबत, सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. दरम्यान. याबाबत म्हणणे ऐकण्यासाठी ग्रामसेवकाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
फौजदारी कारवाईचा इशारा
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ (७) प्रमाणे बोर्डी ग्रामपंचायत आणि सरपंच दंडनीय कार्यवाहीस पात्र ठरली असल्याचे या नोटीसी मध्ये नमूद करण्यात आले आहे. स्वामित्व धनाची रक्कम तसेच बाजारभावाच्या पाचपट दंड असा मिळवून एकूण ९८ हजार ७०० रुपये सात दिवसाच्या आत भरण्याची नोटीस ग्रामपंचायतला बजावण्यात आली असून सात दिवसाच्या त्याबाबतचे पुरावे तसेच म्हणणे साधन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा या नोटीशीत देण्यात आला आहे.
दंड भरा खिशातून
दरम्यान, बोर्डी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामपंचायतला ९८ हजार ७०० रुपयांचा दंड झाला असेल, तर हा दंड सरपंच आणि ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी याने स्वतःच्या खिशातून भरावा. ग्रामपंचायतीने या नागरिकांच्या करातून ही रक्कम भरू नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जोगमेरकर यांनी केली आहे.
‘बोर्डी ग्रामपंचायत संरक्षक भिंतीसाठी समुद्राची वाळू आणली असून दोन ब्रास वाळूसाठी त्यांना दंड भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसात त्यांचे म्हणणे ऐकून, पुरावे लक्षात घेऊन त्यानंतर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
-सुनील कोळी, तहसीलदार, डहाणू