राजीव चंदने
मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांना अनुकूल वातावरण आहे. महायुतीच्या कारभाराला कंटाळलेले नागरिक मुरबाड मध्ये नक्कीच परिवर्तन घडवतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी आज व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या सरळगाव येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी सरळगाव, टोकावडे येथील कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. तसेच शिरोशी येथील कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले. तर तळेगाव, न्याहाडी, मोरोशी भागात रॅली काढून मतदारांना महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी उमेदवार सुभाष पवार, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आप्पा घुडे, महिला उपजिल्हाप्रमुख राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक वाघचौरे, आरपीआय सेक्युलर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. रुपाली कराळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कविता वारे आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत परिवर्तनाची नांदी घडविली. तीच परंपरा विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी व्यक्त करून महायुती सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीला विजयी करावे, असे आवाहन श्री. म्हात्रे यांनी केले.
मुरबाड तालुक्याबरोबरच बदलापूर शहर, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातूनही मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबरच शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व कॉंग्रेसचे कार्यकर्तेही झोकून कार्य करीत आहेत. महायुतीचे काही भागातील कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नक्कीच परिवर्तन घडेल, असा विश्वास उमेदवार सुभाष पवार यांनी व्यक्त केला.
मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये २०२१ मध्ये सर्व शाळांमध्ये १०० टक्के शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यातील काही शिक्षक निवृत्त झाले असून, तेथील रिक्त जागी शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शिक्षकांच्या रिक्त जागांच्या मुद्द्यांवरुन तालुक्यातील मतदारांची दिशाभूल केली जात आहे, याकडे सुभाष पवार यांनी लक्ष वेधले.