नरेंद्र मोदी, पंतप्रधान
श्री रतन टाटा जी आपल्याला सोडून गेले त्याला एक महिना झाला आहे. गजबजलेल्या शहरांपासून ते छोटी शहरे, अगदी गावांपर्यंत, समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात त्यांची उणीव तीव्रतेने जाणवत आहे. प्रस्थापित उद्योगपती,होतकरू उद्योजक आणि मेहनती व्यावसायिक सर्वानीच त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पर्यावरणाप्रती सजगता आणि परोपकाराला वाहून घेतलेल्या प्रत्येकालाही तितकेच दुःख झाले. त्यांच्या निधनाने देशाला तर त्यांची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवली त्याच बरोबर जगालाही ती जाणवली.
युवकांसाठी रतन टाटा प्रेरणास्थान होते,स्वप्ने ही साकारायची असतात आणि करुणा आणि विनम्रता बाळगत यश साध्य होऊ शकते याचे स्मरण ते करून देतात. इतरांसाठी त्यांनी भारतीय उद्योजकतेची सर्वोत्कृष्ट परंपरा सादर केली आणि प्रामाणिकपणा, सर्वोत्कृष्टता आणि सेवा या मुल्यांप्रती ठाम कटिबद्धता त्यांनी जोपासली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने आदर,सचोटी आणि विश्वासार्हता जपत जगभरात नवी शिखरे गाठली. तरीही अतिशय विनम्रतेने आणि दयाळूपणे त्यांनी हे यश स्वीकारले.
इतरांची स्वप्ने साकारण्यासाठी ठाम आधार देणे हा रतन टाटा यांचा एक अनोखा गुण होता. अलीकडच्या वर्षात भारताच्या स्टार्ट अप परिसंस्थेचे मार्गदर्शक म्हणून ते ओळखले जात असत अनेक आशादायी प्रकल्पांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली.युवा उद्योजकांच्या आशा- आकांक्षा त्यांनी जाणल्या आणि भारताच्या भविष्याला आकार देण्याची त्यांची क्षमता ओळखली . अशा युवांना पाठबळ देत धाडस आणि पूर्ण क्षमतेनिशी काम करण्यासाठी अशी स्वप्ने पाहणाऱ्या पिढीला त्यांनी सबल केले.यातून नवोन्मेश आणि उद्योजकतेची संस्कृती निर्माण होण्यासाठी मोठी मदत झाली आणि याचा येत्या दशकांमध्ये भारतात सकारात्मक प्रभाव जारी राहील याचा मला विश्वास आहे.
त्यांनी नेहमीच सर्वोत्कृष्टतेचा पुरस्कार केला आणि भारतीय उद्योगाने जागतिक मापदंड स्थापित करण्याचा आग्रह ठेवला.हा दृष्टीकोन भारताला, जागतिक तोडीची गुणवत्ता बनवण्यासाठी आपल्या भावी उद्योजकांना प्रेरणा देत राहील याचा मला विश्वास आहे.
बोर्डरूम किंवा सहकाऱ्यापुरती अशी त्यांची महानता मर्यादित नव्हती. सर्व मानवतेप्रती त्यांची परोपकारी दृष्टी होती. प्राण्याप्रती त्यांचा दयाळूपणा सर्व परिचित आहे, प्राण्यांच्या कल्याणासाठीच्या प्रत्येक प्रयत्नाला त्यांचे सहकार्य राहिले. एखाद्या व्यवसाय प्रकल्पाप्रमाणेच त्यांच्या जीवनाचा भाग बनलेल्या त्यांच्या श्वानाचे फोटो ते अनेकदा सामायिक करत.त्यांचे जीवन आपल्याला, खरे नेतृत्व आणि व्यक्तिमत्व हे केवळ एखाद्याच्या कामगिरीने नव्हे तर दुर्बलांची काळजी घेण्याच्या क्षमतेने मापले जाते याचे स्मरण करून देते.
कोट्यवधी भारतीयांच्या दृष्टीने, रतन टाटा यांची देशभक्ती संकटाच्या काळात सर्वात तेजस्वी ठरली होती. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील प्रतिष्ठित ताज हॉटेल त्यांनी झपाट्याने पुन्हा उघडणे म्हणजे भारत दहशतवादाला नकार देत एकजुटीने उभा आहे, हे राष्ट्राला सूचित करणारे होते.
व्यक्तिगतरीत्या मला अनेक वर्षांपासून त्यांना जवळून जाणून घेण्याचा विशेषाधिकार मिळाला. आम्ही गुजरातमध्ये जवळून काम केले, जिथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली, यातील अनेक प्रकल्पांवर त्यांचा खूप जीव होता. काही आठवड्यांपूर्वी, मी स्पेन सरकारचे अध्यक्ष श्री पेड्रो सांचेझ यांच्यासमवेत वडोदरा येथे होतो आणि आम्ही संयुक्तपणे एका विमान संकुलाचे उद्घाटन केले जेथे सी-295 विमाने भारतात बनवली जातील. रतन टाटा यांनीच यावर काम सुरू केले होते. रतन टाटा यांची अनुपस्थिती आम्हाला फारच जाणवली हे वेगळे सांगायला नको.
मला रतन टाटा जी हे पत्रलेखक म्हणून ही स्मरणात आहेत – ते वारंवार मला निरनिराळ्या मुद्द्यांवर पत्र लिहीत असत, मग ते प्रशासनाचे विषय असोत, सरकारच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे असो किंवा निवडणूक विजयानंतर अभिनंदनाच्या शुभेच्छा असोत.
जेव्हा मी केंद्र सरकारमध्ये गेलो तेव्हाही आमचा निकटचा संवाद कायम राहिला आणि ते आमच्या राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमधील एक वचनबद्ध भागीदार राहिले. रतन टाटा यांनी स्वच्छ भारत मिशनला दिलेला पाठिंबा विशेषत्वाने माझ्या हृदयाच्या जवळ होता. भारताच्या प्रगतीसाठी स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि साफसफाई अत्यावश्यक आहे हे समजून ते या लोकचळवळीचे मौखिक पुरस्कर्ते बनले. ऑक्टोबरच्या सुरुवातीला स्वच्छ भारत मिशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी दिलेला मनस्वी व्हिडिओ संदेश मला अजूनही आठवतो. हे त्यांच्या काही शेवटच्या सार्वजनिक दर्शनांपैकी एक होते.
त्यांच्या हृदयाच्या जवळची आणखी एक बाब म्हणजे आरोग्यसेवा आणि विशेषत: कर्करोगाविरुद्धची लढाई. मला दोन वर्षांपूर्वीचा आसाममधील कार्यक्रम आठवतो, जिथे आम्ही राज्यातील विविध कर्करोग रुग्णालयांचे संयुक्तपणे उद्घाटन केले होते. त्यावेळच्या त्यांच्या टिप्पण्यांमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की त्यांना त्यांची शेवटची वर्षे आरोग्यसेवेसाठी समर्पित करायची आहेत. आरोग्य आणि कर्करोग सेवा सुलभ आणि परवडण्याजोगी बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे मूळ हे त्या रोगांशी लढा देत असलेल्या रुग्णांबद्दलच्या खोल सहानुभूतीमध्ये होते, समाजातील सर्वात दुर्बळांच्या/असुरक्षितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हेच न्याय्य असल्याचा त्यांना विश्वास होता.
आज जेव्हा आपण त्यांची आठवण काढतो, तेव्हा आपल्याला त्यांनी कल्पिलेल्या समाजाची आठवण होते- जिथे व्यवसाय हा भल्यासाठी असणारी एक शक्ती म्हणून काम करू शकतो, जिथे प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेचे मूल्य असते आणि जिथे प्रगती ही सर्वांच्या कल्याण आणि आनंदात मोजली जाते. त्यांनी स्पर्श केलेल्या जीवनात आणि त्यांनी जोपासलेल्या स्वप्नांमध्ये ते चिरायू आहेत. भारताला एक चांगले, दयाळू आणि अधिक आशादायी ठिकाण बनवल्याबद्दल पुढच्या पिढ्या त्यांच्या कृतज्ञ असतील.