डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिकेतच नव्हे, तर संपुर्ण जगात अनेक बदल पहायला मिळत आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा असेल तो चीन आणि अमेरिका यांच्यातील वैर. यापुढे ते आणखी तीव्र होऊ शकते. यावर जो बायडेन यांच्या कार्यकाळात या वैरभावनेवर शांततेचा एक थर जोडला गेला होता. आता ट्रम्प प्रशासन चीनसोबत व्यापार युद्ध सुरू करू शकते. मात्र याचा फायदा भारताला होताना दिसतो. ट्रम्प यांनी चिनी आयातीवर अधिक शुल्क लावल्यास जगातील सर्वात मोठी मोबाइल निर्माता आयफोन पुढील दोन वर्षांमध्ये भारतात आपले उत्पादन दुप्पट करून 30 अब्ज डॉलरपर्यंत नेऊ शकेल.
‘ॲपल’ सध्या भारतात दर वर्षी सुमारे 15-16 अब्ज डॉलर किमतीचे आयफोन तयार करते. आपल्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर साठ ते शंभर टक्के शुल्क लावण्याची धमकी दिली होती. आपल्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी चीनी आयातीवर विविध प्रकारचे शुल्क लादले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले, की दुसऱ्या कार्यकाळात अशाच धोरणामुळे ‘ॲपल’ भारतातील अव्वल उत्पादक कंपन्यांपैकी एक बनू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ट्रम्प यांच्या पुनरागमनामुळे भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम होऊ शकतो. त्यात सामरिक आणि व्यावसायिक संबंधांचाही समावेश आहे.
एका अधिकाऱ्याच्या मते भारताला काही क्षेत्रांमध्ये तोटा झाला असला तरी इलेक्ट्रॉनिक्स, विशेषत: आयफोन उत्पादनासारख्या क्षेत्रात मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. आपल्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी चीनी वस्तूंवर 25 टक्क्यांपर्यंत शुल्क लादले होते. ट्रम्प यांनी चीनी आयातीवर शुल्क लादण्याची धमकी प्रत्यक्षात अंमलात आणण्याचा प्रयत्न केल्यास ‘ॲपल’ आयफोनचे अतिरिक्त उत्पादन भारतात हस्तांतरित करण्याचा विचार करू शकते. त्यामुळे देशात दोन लाख नोकऱ्या निर्माण होतील आणि आयफोन उत्पादन परिसंस्थेतील भारताचे योगदान येत्या काही वर्षांमध्ये 12-14 टक्क्यांवरून 26 टक्क्यांपेक्षा जास्त होईल. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारल्यानंतर आयफोन उत्पादनातील बहुतेक बदल आकार घेऊ शकतात. भारत सरकार कर आणि दरांमुळे सततच्या खर्चातील अकार्यक्षमता आणि धोरणातील अनिश्चितता दूर करण्यासाठी आणि जास्तीचे उत्पादन चीनमधून व्हिएतनामसारख्या इतर देशांमध्ये हस्तांतरित होणार नाही, याची खात्री करण्यासाठी सखोल सुधारणा करू शकते का, यावरदेखील हे अवलंबून असेल.
30 सप्टेंबर रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ‘ॲपल’ ने 201 अब्ज डॉलर किमतीचे आयफोन विकले. ‘ॲपल’च्या 391 अब्ज डॉलरच्या एकूण उलाढालीच्या ते 51 टक्के होते. भारत सरकारच्या स्मार्टफोन प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेनंतर कंपनीने गेल्या तीन वर्षांमध्ये 12-14 टक्के उत्पादन भारतात हलवले आहे. तरीही 85 टक्क्यांहून अधिक आयफोन चीनमध्ये बनतात. ‘ॲपल’ने जागतिक स्तरावर दुसरा आयफोन उत्पादन आधार म्हणून भारताचा वापर केला आहे. तो दक्षिण आशियाई देशात आपली क्षमता वेगाने वाढवत आहे. भारत हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे स्मार्टफोन मार्केट आहे. आयफोनचे उत्पादन करण्यासाठी कंपनीचे सध्या भारतात फॉक्सकॉन, पेगट्रॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स (पूर्वीचे विस्ट्रॉन) या तीन कंपन्यांशी करार आहेत. जवळपास 70 टक्के स्थानिक उत्पादन अमेरिकेसह विविध देशांमध्ये निर्यात केले जाते.
टाटा समूह तामिळनाडूतील होसूर येथे दुसरी आयफोन सुविधा उभारत आहे. त्यात चाळीस हजार कर्मचारी असतील. येत्या काही महिन्यांमध्ये हा कारखाना कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. अधिकारी अशी अपेक्षा करतात, की अमेरिकन सरकार एका वर्षाच्या आत चीनी आयातीवर शुल्क लावेल, याचा अर्थ ‘ॲपल’कडे भारतात उत्पादन सुविधांचा विस्तार करण्यासाठी सुमारे बारा महिने आहेत; परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की असे कोणतेही पाऊल उचलणे सोपे होणार नाही. कारण भारताने कोणत्याही उत्पादनात इतके उच्च पातळीचे उत्पादन अनुभवलेले नाही.