ठाणे : लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्ज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वांनी न चुकता दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहन खोपट परिसरातील बसस्थानकावर करण्यात आले.
148 ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूकविषयक मतदार जनजागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खोपट परिसरातील बसस्थानकावर मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या जनजागृती मोहिमेत बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाचे मतदान जनजागृतीबाबत लावण्यात आलेले मोठे फलक हे प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी स्वीपच्या पथकाने बसस्थानकावरील प्रवाशांना मतदानाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमात ठाणे परिवहन बसस्थानक येथील सर्व अधिकारी, कर्मचारी व प्रवासी सहभागी झाले होते. यावेळी ‘मतदान जनजागृती’विषयक “माझं मत माझा अधिकार”, “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” आणि “जागरूक मतदार लोकशाहीचा आधार” या घोषणा सर्व प्रवाशांनी मोठ्या आवाजात सामूहिकपणे दिल्या.
