नवी दिल्ली: शरद पवार गटाने अजितदादा गटाचे घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार दिला. त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला एक इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले. या परिपत्रकात तुमचे उमेदवार, कार्यकर्त्यांना शरद पवारांचे फोटो आणि व्हिडीओ वापरु नका, अशा सूचना द्याव्यात, असे न्यायालयाने सुनवाले आहे. तुम्ही दोघांनी आपापल्या युद्धभूमीवर लक्ष केंद्रित करा. व्हिडीओ वगैरेचा कधी कधी प्रभाव पडतो. दरवेळी मतदारांना प्रभावित करेल असे नाही. आपल्या देशातील जनता खूप हुशार आहे, त्यांना कोणी फसवू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले.
अजित पवारांना घड्याळाऐवजी दुसरे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी शरद पवार गटाने केली होती. गेल्या सुनावणीत घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात अजित पवारांनी वर्तमानपत्रात द्यावी , असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
