महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या पाठीमागे भाजपाचे कायम पाठबळ – आराधना मोना मिश्रा
मुंबई : भाजप आणि रास्वसंघाची महिलांबाबतची भूमिका कायम अन्यायी राहिली आहे. महिला अत्याचारांबाबत मणिपूर ते मुंबई असा आताचा भाजपचा प्रवास आहे. महिला अत्याचार करणाऱ्यांच्या पाठिशी कायम भाजप उभा रहातो हे उघड सत्य आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील महिला भाजप आणि शिंदे सरकारला धडा शिकवतील, असे उत्तर प्रदेश विधीमंडळ काँग्रेस पक्ष नेत्या आराधना मोना मिश्रा यांनी म्हटले आहे.
राजीव गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आराधाना मिश्रा पुढे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाचा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ,’ हा नारा पोकळ घोषणा असून महिलांबद्दल भाजपाचे चाल, चरित्र व चेहरा काय आहे ते सर्वांना माहित आहे. हाथरस असो वा महिला खेळाडू, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांच्या मागे भाजपाचे पाठबळ राहिले आहे. मुंबई शहरात महिला अत्याचारांच्या २०२२ मध्ये ६१७६ गुन्ह्यांची नोंद झाली असून महिलांसाठी सुरक्षित मानले जाणाऱ्या मुंबईतही महिला सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रातून ६७ हजार महिला बेपत्ता झालेल्या आहेत. काँग्रेस पक्षाने सातत्याने महिला अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला पण भाजपा सरकार काहीच उत्तर देत नाही, असा हल्लाबोल श्रीमती आराधना मोना मिश्रा यांनी केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थारोत यांच्या मुलींबद्दल संमगनेरमध्ये भाजपा नेत्याने अत्यंत खालच्या पातळीवरची टीका केली पण त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी जयश्री थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांवरच गुन्हे दाखल केले. बदलापुरातील आरएसएसच्या शाळेतील लहान मुलींवरील अत्याचाराने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली पण या घटनेतही भाजपा सरकारने मुख्य आरोपींना वाचवण्याचेच काम केले. आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण दडपून टाकल्याने या प्रकरणातील खरे आरोपी समोर आलेच नाहीत. जळगावात अल्पवयीन मुलीवर भाजपाच्या नगरसेवकाने अत्याचार केले. बनारस हिंदु विद्यापीठात एका विद्यार्थीनीवर भाजपा आयटी सेलच्या मुलांनी बलात्कार केला. अशा अनेक घटनांमध्ये भाजपाचेच हात बरबरटले आहेत. महागाईचा सर्वात मोठा फटका महिलांनाच बसतो, घर चालवणे त्यांना कठीण झाले आहे, उज्ज्वल योजनेचाही फज्जा उडाला आहे असे मिश्रा म्हणाल्या.
आदिवासी महिलेला राष्ट्रपती केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत पण त्याच महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलावले नाही. नवीन संसद भवनच्या उद्घाटनालाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावले नाही, हा फक्त राष्ट्रपती महोदयांचाच नाही तर समस्त महिलांचा अपमान आहे. काँग्रेसने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन राजकारणात महिलांचा सक्रीय सहभाग वाढवला आहे. आताही महालक्ष्मी, गृहलक्ष्मी योजनांच्या माध्यमातून काँग्रेस महिला सक्षमिकरणाचे काम करत आहे असेही आराधना मिश्रा म्हणाल्या. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपुत, मीडिया प्रभारी चयनिका उनियाल, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते आदी उपस्थित होते.
000000
