एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक नारायण पवार यांची घेतली भेट

 

ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येताच उमेदवारांनी राजकीय खेळी खेळण्यास सुरूवात केली असून अशाचप्रकारे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे यांनी प्रचारादरम्यान एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची घेतली. या भेटीची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. यानिमित्ताने मतांच्या जोगव्यासाठी विचारे यांनी भाजप कार्यालयात पायधूळ केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार संजय केळकर, शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यासह इतर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. असे असले तरी या तीन उमेदवारांमध्येच खरी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. या तिरंगी लढतीमुळे येथे अटीतटीचा सामना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेणे, प्रभाग फेरीदरम्यान मतदारांच्या भेटी घेणे, स्थानक परिसरात प्रचार फेरी काढणे, प्रचार रॅली काढणे, पक्षातील नेत्यांच्या चौक आणि जाहीर सभा घेणे, यावर तिन्ही उमेदवारांकडून भर देण्यात येत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने तिन्ही उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविला असून त्याचबरोबर राजकीय खेळी खेळण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे.अशाचप्रकारे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे यांनी प्रचारादरम्यान एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची घेतली असून त्याचे चित्रफित समाजमाध्यांवर प्रसारित झाली आहे. पाचपाखाडी येथील सिद्धेश्वर तलाव परिसरात ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा प्रभाव रहिला आहे. पॅनल पद्धतीमध्ये हा परिसर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या चंदनवाडी परिसराला जोडण्यात आला आहे. २०१७ च्या निवडणुकीत पवार यांच्या पॅनलने विचारेंचे पुतणे मंदार विचारे यांचा पराभव केला. तसेच नारायण पवार हे पूर्वी पाच वेळा काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले असून गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढली आणि या निवडणुकीत ते निवडून आले. नारायण पवार हे काँग्रेस पक्षात होते, तेव्हापासून पवार आणि विचारे यांच्यात राजकीय वैर आहे. हे दोघे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेले आहेत. असे असतानाच, विचारे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतल्याने मतांच्या जोगव्यासाठी राजन विचारेंची भाजप कार्यालयात पायधूळ केल्याची चर्चा रंगली आहे. या संदर्भात राजन विचारे यांच्याशी संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
कोंट
ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांची प्रचार फेरी रायगड गल्ली परिसरातून जात होती. त्यावेळी मी कार्यालयात बसलेलो होतो. अचानकपणे विचारे हे माझ्या कार्यालयात आले आणि त्यांनी माझी भेट घेतली. परंतु आम्ही आमचे उमेदवार संजय केळकर यांचा जोरदार प्रचार करीत असून ते चांगल्या मताधिक्याने विजयी होतील. – नारायण पवार, माजी नगरसेवक,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *