ठाणे : श्री आनंद भारती व्यायामशाळेच्या विद्यमाने रविवार,१७ नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्हास्तरीय ४२ व्या आनंद श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने हि स्पर्धा होत असल्याची माहिती संस्थेचे सचिव संदीप कोळी यांनी दिली.
गतवर्षी २७ डिसेंबर रोजी व्यायामगुरू आणि शरीरसौष्ठव खेळाला ठाणे जिल्हयात नावारूपाला आणणारे रमेश रामजी चव्हाण यांचे निधन झाले. त्यांच्यास्मृतीप्रित्यर्थ यंदापासून त्यांच्यानावे शरीरसौष्ठव खेळातील जेष्ठ आणि क्रियाशील कार्यकर्त्याला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाच्या पहिल्या पुरस्कारासाठी माजी कबड्डीपटू, पॉवरलिफ्टर आणि ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे माजी अध्यक्ष कमलाकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.रविवारी होणाऱ्या ४२ व्या आनंद श्री शरीरसौष्ठव स्पर्धेदरम्यान कमलाकर पाटील यांना सदर पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल असे संस्थचे व्यायामशाळा प्रमुख सचिन काटकर यांनी सांगितले.
