गुहागर : “शिवसेनेच्या नेत्यांनी रामदास कदम यांना नजरकैदेत ठेवावे किंवा मनोरुग्णालयात ठेवावे”, अशी मागणी भाजपच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे केली आहे. ऐन निवडणूक काळात गुहागरमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रचार थांबवला आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला आहे.

फक्त गुहागरच नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दापोलीमध्येही शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांचा प्रचार थांबवला आहे. मतदानाला केवळ आठ दिवस बाकी असताना जिल्हाभरात भाजपने प्रचाराचं काम थांबवल्यामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

“रामदास कदम यांनी तात्काळ डॉक्टर विनय नातू आणि भाजपची माफी मागावी. अन्यथा संध्याकाळपर्यंत आम्ही आमचा निर्णय घेऊ”, अशी आक्रमक भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे. “विनय नातू हे आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. त्यामुळे आमच्या नेत्यावरती कोणीही काही बोललेलं आम्ही सहन करणार नाहीत. रामदास कदम आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांची मिलीभगत आहे”, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *