ठाणे जिल्ह्यात एक कोटीहून अधिक नागरिक घेणार सामूहिक मतदार शपथ
नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सूचनेनुसार विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामधील एक अभिनव उपक्रम गुरुवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी, सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत ठाणे जिल्ह्यामधील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय – निमशासकीय कार्यालये, गृहनिर्माण सोसायटी तसेच सर्व आस्थापनांवरील अधिकारी – कर्मचारी यांनी मतदानाची सामूहिक शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 150 ऐरोली व 151 बेलापूर विधानसभा मतदार संघ क्षेत्रात ठिकठिकाणी मतदान शपथ घेण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तशा प्रकारचे निर्देश संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना दिलेले असून महापालिका मुख्यालयासह महानगरपालिकेची आठही विभाग कार्यालये, इतर कार्यालये, रुग्णालये, सर्व शाळा – महाविद्यालये तसेच गृहनिर्माण सोसायट्या आणि शासकीय – निमशासकीय कार्यालयांमध्येही सकाळी 11 वा. सामूहिक मतदान शपथ घेतली जाणार आहे.
सकाळी ठीक ११ वाजता ही शपथ घ्यायची असल्याने नागरिकांना वेळेचे आकलन व्हावे याकरिता महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर, नेरूळ, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा ही सात विभाग कार्यालये आणि बेलापूर, वाशी व कोपरखैरणे ही तीन अग्निशमन केंद्रे अशा १० ठिकाणी असलेले सायरन सकाळी 10.59 वाजता वाजविले जाणार आहेत. जेणेकरून आता सामूहिक मतदान शपथ घ्यावयाची आहे हे त्या विभागातील नागरिकांना कळून एकाच वेळी सामूहिकरित्या मतदार शपथ घेतली जाईल.
“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” – असा मतदान शपथेचा नमुना आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीमध्ये ठाणे जिल्हा हा सर्वोत्तम असावा या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनीही मतदान करण्याविषयी आपली जागरूकता प्रदर्शित करण्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी, सकाळी 11 वाजता, सामुहिक मतदार शपथ कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
