भारतात ‌‘यूपीआय‌’चा जलद वापर संपूर्ण जगासाठी एक उदाहरण बनत आहे. सध्या ‌‘यूपीआय‌’ ही देशातील सर्वात सोपी पेमेंट प्रणाली आहे. यूपीआय म्हणजेच ‌‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस‌’ (यूपीआय) च्या वापरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऑक्टोबरमध्ये देशात ‌‘यूपीआय‌’च्या माध्यमातून 16.58 अब्ज व्यवहार झाले. त्याची किंमत सुमारे 23.5 लाख कोटी रुपये होती.
एप्रिल 2016 मध्ये ‌‘यूपीआय‌’ लाँच झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. ऑक्टोबरमध्ये दैनिक ‌‘यूपीआय‌’ व्यवहार 535 दशलक्ष होते. ‌‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया‌’ने (एनपीसीआय) जारी केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये व्यवहारांच्या संख्येत दहा टक्के आणि मूल्यात 14 टक्के वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये दैनंदिन ‌‘यूपीआय‌’ व्यवहारांची संख्या 535 दशलक्ष होती. या काळात सरासरी दैनंदिन व्यवहाराचे मूल्य 75,801 कोटी रुपये होते तर सप्टेंबरमध्ये सरासरी दैनिक व्यवहारांची संख्या 501 दशलक्ष आणि मूल्य 68,800 कोटी रुपये होते. ‌‘आयएमपीएस‌’द्वारे 467 दशलक्ष व्यवहार झाले. सप्टेंबरच्या 5.65 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत गेल्या महिन्यात ‌‘आयएमपीएस‌’द्वारे झालेल्या व्यवहारांचे मूल्य 11 टक्क्यांनी वाढून 6.29 लाख कोटी रुपये झाले.
ऑक्टोबरमध्ये फास्टॅगद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या 8 टक्क्यांनी वाढून 345 दशलक्ष झाली आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा 318 दशलक्ष होता. गेल्या महिन्यात फास्टॅग व्यवहारांचे मूल्य 6,115 कोटी रुपये होते. सप्टेंबरमध्ये ते 5,620 कोटी रुपये होते. ‌‘एनपीसीआय‌’ डेटानुसार ऑक्टोबरमध्ये आधार सक्षम पेमेंट सिस्टीम (एईपीएस) वर 126 दशलक्ष व्यवहार झाले. ते सप्टेंबरमधील 100 दशलक्षांपेक्षा 26 टक्के अधिक आहे. भारतात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. मार्च 2021 मध्ये, ग्राहकांच्या खर्चात डिजिटल व्यवहारांचा वाटा 14 ते 19 टक्के होता. तो आता 40 ते 48 टक्के झाला आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये (एप्रिल-सप्टेंबर) ‌‘यूपीआय‌’ आधारित व्यवहारांची संख्या 52 टक्क्यांनी वाढून 78.97 अब्ज झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ती 51.9 अब्ज होती. त्याच वेळी, या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये ‌‘यूपीआय‌’ व्यवहारांचे मूल्य 83.16 लाख कोटी रुपयांवरून 40 टक्क्यांनी वाढून 116.63 लाख कोटी रुपये झाले आहे.

वृत्तवेध 5
चहा, बिस्कीट, तेल शांपू महागणार

मुंबईः सर्वसामान्य माणसाला महागाईचा नवा तडाखा बसण्याची शक्यता आहे. रोजच्या वापरातील गृहोपयोगी तसेच खाद्यपदार्थ आणि वस्तू (उदाहरणार्थ चहा, बिस्कीट्स, तेल, शाम्पू अशा सर्वच) महागण्याची शक्यता आहे.
जुलै- सप्टेंबर तिमाहीमध्ये ‌‘हाय प्रोडक्शन कॉस्ट आणि फूड इनफ्लेशन‌’च्या कारणाने ‌‘एफएमसीजी‌’ कंपन्यांचे मार्जिन कमी झाले. त्याचा परिणाम शहरी क्षेत्रातील विक्रीवर दिसत आहे. त्यामुळे या कंपन्या आता आपली उत्पादने महागात विकू शकतात. काही कंपन्यांनी खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‌‘हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड‌’पासून गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिडेट, मॅरिको, आयटीसी आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये शहरांमध्ये घटलेल्या पदार्थांच्या विक्रीची चिंता सतावत आहे. सप्टेंबर तिमाहीमध्ये शहरी क्षेत्रात अंदाजापेक्षा कमी विक्री झाली आहे. तज्ज्ञांच्या मते ‌‘एफएमसीजी‌’ सेक्टरच्या एकूण विक्रीमध्ये शहरातील विक्रीचा हिस्सा 65-68 टक्के असतो. सप्टेंबर तिमाहीदरम्यान शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात चांगली विक्री झाली आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये झालेला हा तोटा एक शॉर्ट टर्म झटका आहे. त्यामुळे खर्च स्थिर करून मार्जिन वसुल केले जाईल, असे ‌‘जीसीपीएल‌’चे व्यवस्थापकीय संचालक आणि ‌‘सीईओ‌’ सुधीर सीतापती यांनी म्हटले आहे. या काळात खाद्यपदार्थांचे वाढलेले दर आणि शहरी भागात मागणीत झालेली घट हीदेखील या घसरणीची कारणे मानली जात आहेत.
शहरी क्षेत्रात ग्राहकांच्या खरेदीवर मोठा परिणाम झाला आहे. खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर प्रभाव झाल्याचे ‌‘टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड‌’चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुनील डिसुझा यांनी म्हटलेले आहे. या तिमाहीमध्ये मार्केट व्हॉल्युम ग्रोथ सुस्त राहिली आहे. अलीकडच्या तिमाहीमध्ये शहरातील वाढ प्रभावित झाली आहे, तर ग्रामीण क्षेत्रात हळूवार का होईना, वाढ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *