ठाणे : धनंजय मुंडे यांना पक्षात घेणे हे शरद पवार यांच्या मनाविरुद्ध झाले होते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व मुंब्रा कळवा विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले.

राज ठाकरे यांना शेतकऱ्यांबद्दल किती माहिती आहे त्याची माहिती मला नाही पण शरद पवार हे तळागाळातील कार्यकर्त्यांचे नेते आहेत हे त्यांचे मत मला बिलकुल मान्य आहे. एखादा माणूस दिल्ली पासून मुंबईपर्यंतचे राजकारण करत असेल आणि मुंबईपासून अक्कोलकोट-पंढरपूरपर्यंतचे राजकारण करत असेल तर त्याला तोड नसते. घरात बसून राजकारण करता येत नाही. धनंजय मुंडे हे अनेकवेळा शरद पवार यांच्याकडे गेले. पक्षात घ्या अशी विनंती केली. शरद पवार यांनी सहा महिने टाळाटाळ केली.त्याच्यानंतर त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना फोन केला. गोपीनाथराव घर फुटू देऊ नका, काही करा आणि सांभाळा, असे शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांना सांगितले. हे झाल्यानंतर तरीही धनंजय मुंडे हे शरद पवार यांच्या घरी येत राहिले. नंतर काही मित्रांनी ते येतायेत तर येऊ द्या ना आपल्याला काय करायचे आहे, हे सांगितले. त्यानंतर धनंजय मुंडे यांना पक्षात घेण्यात आले. हे शरद पवार यांच्या मनाविरुद्ध झाले होते. शरद पवार यांनी हे गोपीनाथ मुंडे यांना सांगितले होते, गोपीनाथ मुंडे यांनी मला ही गोष्ट सांगितली होती. गोपीनाथ मुंडे यांचे घर फुटल्यावर गोपीनाथ मुंडे यांचे मत काय होते हे मी अधिक जाणतो, असे उद्गार आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी काढले.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *