मंत्री महाजन, भुसे, भुजबळ, पाटील अडकले मतदारसंघात
हरिभाऊ लाखे
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीच्या लढती रंगत असून, महायुती सरकारमधील सहा मंत्र्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. या मंत्र्यांवर ३५ जागांची जबाबदारी असतानाच यंदाच्या निवडणुकीत बदलत्या राजकीय वातावरणामुळे बड्या नेत्यांच्या मतदारसंघांत महाविकास आघाडीकडून तगडे उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. त्यामुळे ‘बिग फाइट’ रंगणाऱ्या या नेत्यांच्या मतदारसंघांतील वातावरण ‘टाइट’ झाले आहे.
लोकसभेला उत्तर महाराष्ट्रातील वातावरण ‘मविआ’च्या बाजूने फिरल्याने हे नेते स्वतःच्याच मतदारसंघात अडकून पडले आहेत. मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, छगन भुजबळ, डॉ. विजयकुमार गावित, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांना स्वतःच्या जागा सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उत्तर महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचा गड राहिला आहे. गेल्या वेळेस विधानसभेतील ३५ पैकी २८ जागा महायुतीकडे होत्या. परंतु, लोकसभा निवडणुकीत येथील सहापैकी चार जागांवर महायुतीचा पराभव झाला. राज्यातील बदललेल्या राजकारणाचा, तसेच घटनाबदलाच्या मुद्याने महायुतीची दाणादाण झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
उत्तर महाराष्ट्रात महायुती सरकारमधील सहा मंत्री असून, त्यात नाशिकमधून छगन भुजबळ, दादा भुसे, नंदुरबारमधून डॉ. विजयकुमार गावित, तर जळगावमधून गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील यांचा समावेश आहे. या सहा मंत्र्यांची प्रतिष्ठा सध्या पणाला लागली आहे. परंतु, हे सर्व मंत्री सध्या आपापल्या मतदारसंघातच अडकून पडले आहेत. महाविकास आघाडीचे तगडे उमेदवार, तसेच बंडखोर रिंगणात आल्याने सत्ताधारीविरोधात नकारात्मक वातावरण तयार होण्याची भीती लक्षात घेऊन सर्वजण कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीचे मातब्बर नेते असलेले अक्राणीचे माजी मंत्री के. सी. पाडवी, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासमोरही यंदा मतदारसंघात कडवे आव्हान उभे ठाकले आहे.
त्यामुळे या आजी-माजी मंत्र्यांना आपल्या जागा टिकविताना मोठी कसरत करावी लागत आहे. नंदुरबारमध्ये अटीतटी भाजपचे नेते तथा आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित १९९४ पासून सलग सहा वेळा नंदुरबार मतदारसंघातून निवडून येत आहेत. आता सातव्यांदा विधानसभेत जाण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असले, तरी त्यांना यंदा प्रथमच काँग्रेसच्या किरण तडवींकडून कडवे आव्हान मिळाले आहे. लोकसभेत कन्येचा पराभव झाल्यानंतर, तसेच चारही मतदारसंघांत गावित कुटुंबातील व्यक्ती उभ्या असल्यामुळे त्यांच् विरोधात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. काँग्रेसला शिवसेना शिंदे गटानेही बळ पुरविल्याने नंदुरबारची लढाई आता अटीतटीची बनली आहे.
०००००
