– महाविकास आघाडीचा विजय निश्चित
कणकवली :विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्गात धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. गद्दारी विरुद्ध खुद्दारी असा सामना असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता गद्दारांना जागा दाखवतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे निश्चितपणे विजयी होतील असा विश्वास ऊबाठा सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीआज येथे व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या सिंधुदुर्गातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या आज आल्या असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील विश्वास व्यक्त केला.
कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेले निलेश राणे यांनी यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात केलेली चिखल फेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का? असा सवाल करत निलेश राणे यांनी यापूर्वी केलेली वक्तव्ये तसेच बाळासाहेबांबत घेतलेली भूमिका जर एकनाथ शिंदे यांना मान्य असेल तर त्यांनी तसे जाहीरपणे सांगावे ही आमची मागणी असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.यावेळी त्यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक ,माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या, नारायण राणे हे स्वतः खासदार आहेत त्यांचे दोन मुलगे दोन विधानसभा मतदारसंघात आमदारकीसाठी उभे आहेत आणि तिसरा मुलगा असता तर त्यांनी सावंतवाडीत उभा केला असता. केवळ घराणेशाही सिंधुदुर्गात जोपासण्याचे काम राणे करत आहेत. राणे यांना विकास करायचा असेल तर आता कोणते पद हवे आहे..? यापूर्वी आमदार पदापासून ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत सर्व पदे त्यांनी भूषविली. केंद्रीय मंत्रीपदही भूषविले आहे. मग आता आणखी कोणते पद मिळाले म्हणजे ते विकास करणार असा सवाल करताना त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री असताना जे विकास करू शकले नाहीत त्यांनी आता विकासाची भाषा करू नये. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. दडपशाही, गुंडागर्दी, दहशतवाद विरोधात आमचा लढा सुरू आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना असून संदेश पारकर यांनी लोकांशी चांगला संपर्क ठेवला आहे घराणेशाही विरोधात ते उभे आहेत तर कुडाळ मालवण मतदारसंघात प्रचारादरम्यान निलेश राणे हे वैभव नाईक यांच्या विरोधात जेवढे बोलतील तेवढी वैभव नाईक यांची मते वाढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता धर्मवीर – ३ हा चित्रपट काढावा आणि त्या चित्रपटातून निलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दलची जी मुक्ताफळे उधळली आहेत ती दाखवावीत.
त्या म्हणाल्या,२०२४ मध्ये धनुष्यबाण नावाला शिल्लक ठेवणार नाही असे म्हणणाऱ्या राणे यांना आता एका हातात धनुष्यबाण घ्यावा लागत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
निलेश राणे यांचे बाळासाहेबांबद्दलचे मत जर शिंदे यांना मान्य असेल तर मग त्यांचे बाळासाहेब यांच्याबद्दलचे प्रेम बेगडी आहे हे स्पष्ट होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे त्यामुळे छत्रपतींचा मान राखा. पुतळा प्रकरणात भ्रष्टाचार केलात आणि आता नाहक टीका करत आहात. कपडे बदलल्याप्रमाणे पक्ष बदलणाऱ्या माणसांकडून विकासाची अपेक्षा काय ठेवणार असे सांगताना भाजपची मंडळी राणे यांना पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत सावंतवाडीतील देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ऑडिओ क्लिप ‘ प्रकरणावरून हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे कोकणातील खुद्दार गद्दारांना पाडल्याशिवाय राहणार नाहीत असेही यावेळी अंधारे म्हणाल्या.
