भुजबळांच्या येवल्यात जरांगेचा एल्गार

येवला : निवडणूक लढविण्याचा माझा निर्णय मागे घेताना मी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही, मराठा बांधवांनी ज्याला पाडायचं आहे त्याला पाडावे, ज्याला निवडून आणायचं आहे त्याला निवडून आणावे. फक्त कोणताही निर्णय घेत असताना मराठा आरक्षण डोक्यात ठेवावं, असा एल्गार मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांच्या येवल्यातून पुकारला आहे.

 कोणाला पाडा हे सांगायला मी आलो नाही.  मात्र मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडा असे सांगतानाच जरांगे यांनी आपली ही येवला भेट सांत्वन पर भेट आहे. आता रस्त्यात गाव आहे. ते बाजूला सारू का?  कोणाला पाडा हे सांगायला मी आलो नाही, मात्र मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला पाडा, आता कोणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष? असं म्हणत त्यांनी यावेळी छगन भुजबळ यांना टोला लगावला आहे.

माझ्या पोटात एक आणि ओठात एक अस काही नाही. मी ठरवले तर डायरेक्ट कार्यक्रमच करतो. आता एक माईक जुना झाला म्हणून दुसरा हातात घेतला. तो सारखा सारखा बिघडतो. त्यामुळे नवा हातात घेतला, माईकचे उदाहरण देत त्यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, यावर भाष्य करतान छगन भुजबळ यांनी सावध प्रतिक्रीया दिली. मनोज जरांगे माझ्या मतदारसंघातील कोणाच्या तरी कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले.  कोणाच्या तरी येथे सांत्वनासाठी आले. दु:खाच्या प्रसंगात कार्यकर्त्याच्या घरी जाणं चांगली गोष्ट आहे. त्यांनी म्हटलं की आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्यांना पाडा, तेही त्यांचं बरोबर आहे. मात्र शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेस, फडणवीस, शिंदे, अजितदादा आणि मी आम्ही कोणीच आरक्षणाला विरोध केलेला नाही, मी ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आम्ही आता आरक्षणाच्या लढाईसाठी सामूहिक उपोषणाची तयारी करणार आहोत, असं काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. यावर बोलतान छगन भुजबळ म्हणाले की, सरकार कोणाचं आलं तरी जरांगे उपोषण करणार आहे. सरकार महायुतीचे स्थापन होणार यात शंका नाही.  जे अधिकार लोकशाहीने दिलेले आहेत ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. शांततेने कोणीही लोकशाही मार्गाने आपलं म्हणण मांडू शकतो असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *