ठाणे : विधानसभा निडणूकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी मतदानाच्या दिवशी तसेच त्यापूर्वीच्या दोन दिवसांत ड्रोनद्वारे पाहाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या मतदारसंघात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास पोलिसांना संबंधित ठिकाणी जाऊन तात्काळ पाहाणी करणे शक्य होणार आहे. आयुक्तालय क्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी ड्रोन उपलब्ध असतील.

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील सर्वाधिक १४ मतदारसंघ हे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात आहेत. ठाणे पोलिसांकडून मागील काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दररोज पायी गस्ती घातले जात आहे. तसेच ठिकठिकाणी रुट मार्च देखील काढण्यात आले आहेत. निवडणूकीच्या कालावधीत अनेकदा मतदान केंद्र किंवा एखाद्या ठिकाणी गोंधळ उडत असतो. आयुक्तालय क्षेत्रात तब्बल १४ मतदारसंघाचा भाग असल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असते. त्यामुळे केंद्रीय सशस्त्र दलाच्या तुकड्या देखील पाचारण करण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक पातळीवर पोलिसांचाही बंदोबस्त असतो. सर्वत्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असले तरी काही ठिकाणी गोंधळाची किंवा कायदा सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नसते. त्यामुळे ठाणे पोलिसांनी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत. या सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत या ड्रोनचा वापर केला जाणार आहे. त्याचे चित्रीकरण ठाणे, भिवंडी आणि उल्हासनगर येथील नियंत्रण कक्षामध्ये संलग्न केले जाणर आहे. एखाद्या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पोलिसांकडून तात्काळ त्या ठिकाणी पाहणी करून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे. मागील लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत ड्रोनचा वापर झाला नव्हता. परंतु या निवडणूकीत ड्रोनचा वापर केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ड्रोनचा वापर केला जाणार आहे. मागील काही दिवसांपासून ड्रोनचा वापर करून आमच्या कर्मचाऱ्यांनी कारवाया देखील केल्या आहेत. तसेच संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात पोलिसांचा देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. – ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर पोलीस.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *