– गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे यांच्यात रंगणार सामना
हरिभाऊ लाखे
जामनेर : मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राहिलेले दिलीप खोडपे यांनाच आपल्याकडे खेचत राष्ट्रवादी शरद पवार गटाने संकटमोचक गिरीश महाजन यांच्यापुढे उभे केले आहे. आपल्याच मतदारसंघात स्वकियाशी लढा देऊन सातव्यांदा विजय मिळविण्याचे महाजन यांच्यासमोर आव्हान आहे. विशेष म्हणजे खोडपे मराठा समाजाचे असल्याने जरांगे फॅक्टरचा त्यांना कितपत फायदा होतो, याकडेही लक्ष लागून आहे.
सन १९९५ नंतर गिरीश महाजन यांना सातत्याने विजय मिळाल्यामुळे या जागेला भाजपचा अभेद्य किल्ला मानले जाते. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकांत जामनेरमध्ये गिरीश महाजन यांनी सहाव्यांदा आपली दावेदारी केली होती. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीकडून संजय गरूड रिंगणात होते. महाजन यांनी १,१४,७१४ मते घेत विजय मिळवला. संजय भास्करराव गरूड यांना ७९,७०० मतांवर समाधान मानावे लागले. मात्र, पारंपरिक विरोधक असलेले संजय गरूड यांनाच भाजपमध्ये घेऊन महाजन यांनी प्रचाराच्या कामाला लावण्यात यश मिळविले.
गरूड यांना भाजपमध्ये घेऊन महाजन यांनी विधानसभेची लढाई जिंकली असे वाटत असतानाच राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमधील ज्येष्ठ पदाधिकारी गिरीश महाजन यांच्याबरोबर काम करणाऱ्या खोडपे यांना आपल्या गोटात घेऊन त्यांना उमेदवारी देत महाजनांची खेळी त्यांच्यावरच उलटवली. खोडपे जनतेतील चेहरा असून, मराठा समाजाचे आहेत. शरद पवार यांनी रचलेल्या या चक्रव्यूहात अडकलेले महाजन तो भेदून विजयाचे तोरण बांधतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकीकडे महाजन हे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे याच्या ‘टार्गेट’ वर असल्याने मतदारसंघावर प्रभाव असणाऱ्या मराठा समाजाचा कौल कुठल्या बाजूला जातो, यावर निवडणुकीच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.
