आजचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग समजले जाते. २१ व्या शतकातील या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्ट फोन, इंटरनेट हे प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनले आहेत. केवळ घरातील मोठ्या माणसंकडेच नव्हे तर शाळकरी मुलांकडे देखील मोबाईल फोन पाहायला मिळत आहे. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांनी घेऊन दिलेला मोबाईल अजूनही मुलांच्या हातात आहे. हाच मोबाईल आज मुलांचा सर्वात जवळचा सहकारी बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुले मोबाईललाच चिकटून बसलेली असतात. आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगात मोबाईल हा गरजेचा आहे. तो गरजेपुरातच वापरला गेला पाहिजे मात्र आज मुलांसाठी मोबाईल हेच सर्वस्व होऊन बसले आहे. आजच्या मुलांना मोबाईलने भुरळ घातली आहे. दिवसातील पाच ते दहा तास मुले मोबाईल वरच असल्याने मुलांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटत चालली आहे त्यामुळे मुलांचे बालपण हरवत चालले की काय अशी शंका मनात येते. आजची मुले जास्त प्रमाणात टीव्ही, संगणक, मोबाईल, इंटरनेट, व्हिडीओ गेम, व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियात दंग असतात. तंत्रज्ञानरुपी राक्षसानं मुलांचं बालपणच खाऊन टाकलंय. पूर्वी शाळांना सुट्ट्या लागल्या की गावागावातील मैदाने मुलांनी भरून गेलेली असायची पण आज ती मैदाने विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात ओस पडली असल्याचे चित्र पाहायला मिळते. क्रिकेट वगळता एकही मैदानी खेळ खेळताना मुले दिसत नाहीत. देशी खेळ तर आजच्या मुलांना माहीतच नाहीत. गोट्या भोवरे विटीदांडू खेळताना कोणी दिसत नाही. आट्यापाट्या आणि सुरपारंब्या या खेळाचे नियम तर सोडाच पण नावही आजच्या मुलांना माहीत नाही. मोठे रिंगण घेऊन त्यात गोट्यांचा डाव लावल्याचे चित्र आज पाहायला मिळत नाही. गलगुट करून खेळणे व त्यावर राज्य द्यावे लागल्याचे हल्लीच्या मुलांमध्ये ऐकिवातही नाही. भोवऱ्याच्या रिंगणाचीही तीच अवस्था. दगडावर आरी घासून भोवऱ्याला टोक करीत बसलेला मुलगा शोधूनही सापडेनासा झाला आहे. जुन्या कपड्यांचा चेंडू तयार करून खेळला जाणारा रप्पाधप्पीचा खेळ हल्लीच्या मुलांना माहीतही नाही. लपंडाव, विटीदांडू,, लगोरी, कुरघोडी, चंपूल, उडाणटप्पू हे खेळ आता दुर्मिळ झाले आहेत. लंगडी हा खेळ आता फक्त शाळेतील पिटी च्या तासापूरता उरला आहे. या खेळांमुळे मुलांचा शारीरिक व्यायाम व्हायचा शिवाय संघभावना, एकी, आपुलकी, नेतृत्व हे गुण या खेळांमुळे मुलांमध्ये विकसित व्हायचे. या खेळाची जागा आता टीव्ही, संगणक, मोबाईल व्हिडीओ गेम यांनी घेतली आहे. टीव्ही, संगणक, व्हिडीओ गेममुळे मुलांना विविध खेळांची माहिती उपलब्ध होऊन त्यातून मुलांचा बौद्धिक विकास होतो असे वाटत असले तरी त्यांचा शारीरिक विकास खुंटत चालला आहे याचा समाजातील सर्व घटकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मुलांना पुन्हा मैदानाकडे आणण्याची जबाबदारी पालक, शिक्षक व समाजातील सर्वच घटकांची आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५?