महाविकास आघाडीचे सरकार आले तर देशाचे राजकारण बदलेल – अजय राय
अनिल ठाणेकर
ठाणे : महाराष्ट्र ही शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीवर गद्दारी फार काळ टिकणार नाही. यावेळेस महाराष्ट्रात परिवर्तन होणारच आहे. हे परिवर्तन होत असताना पाच वर्ष मागे जाऊन पहा, जेव्हा अंधारात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा शरद पवार यांच्यासोबतडॉ..जितेंद्र आव्हाड हेच पहाड बनून उभे राहिले होते, अशा शब्दात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनीडॉ..जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवारडॉ..जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारार्थ मुंब्र्याच्या एमएप व्हॅली येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत कन्हैय्या कुमार बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रांताध्यक्ष अजय राय यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते.
आपल्या भाषणात कन्हैय्या कुमार यांनी देशभरातील विविध मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, येत्या २० तारखेला परिवर्तनासाठी मतदान करायचे आहे. मी काही एवढा मोठा नाहि की तुम्हाला काही शिकवायला आलो आहे. पण, धर्मनिरपेक्षतेच्या प्रत्येक लढाईत ठाम उभे राहणाऱ्याडॉ..जितेंद्र आव्हाड यांना पाठबळ देण्याची भूमिका आपली असली पाहिजे. त्यासाठीच आपण इथे आलो आहोत. आपण देश आणा राज्यातील सत्ताधाऱ्यांना पहात आहात. मी स्वतः विविध राज्यांमध्ये फिरत आहे. पण, गडबड करणे हेच भाजपचे काम आहे. हरयाणामध्ये आपण जिंकत होतो. मात्र, भाजपने गडबडी केली. म्हणूनच प्रत्येक मत महत्वाचे आहे. प्रत्येकाने जितेंद्र आव्हाड यांना मत देऊन सेक्युलर आवाज बुलंद केला पाहिजे. अजित पवारांबाबत बोलताना कन्हैय्या कुमार यांनी, खरी राष्ट्रवादी आणि डॉ..जितेंद्र आव्हाड हे हिमतीने लढत आहेत. म्हणूनच अजित पवारांनी घड्याळ चोरून नेले. पण, आता त्यांचे घड्याळ बंद पडले आहे. तरीही, हे बंद घड्याळ पुढे करून अजित पवार हे जनतेला ‘गुमराह’ करीत आहेत. पण, त्यांनी हे लक्षात ठेवावे; त्यांचा खेळ अनिश्चिततेचा आहे. त्याने आमच्या निश्चिततेला फरक पडणार नाही, असे सांगितले.
संविधानाच्या प्रस्तावनेवर कोणाचा विश्वास आहे, हे आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. आपणाला आता ५० कोटी घेऊन गद्दारी केलेल्यांशी लढायचे आहे. कारण, गद्दारीचा पाया रचणारे उपमुख्यमंत्री धर्म वाचविण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांना आपण सांगू इच्छितो की, ईश्वराला ताकद देणारे आपण कोण? , असे म्हणत नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. गेल्या काही वर्षात त्यांनी जनतेला रडविले आहे. आता २३ तारखेला त्यांना जनता रडवणार आहे. गेल्या पाच वर्षात ८ लाख लोकांनी परदेशी नागरिकत्व घेतले आहे. एवढी भीती देशात निर्माण झाली आहे. या देशाची जमीन आपल्या रक्ताने, घामाने शिंपडणार्या शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करावी लागत आहे. पण, मोदी सरकार आपल्या मित्रांचे १६ लाख कोटी रूपयांचे कर्ज माफ करीत आहे. देशाची तिजोरी शेतकरी- कष्टकऱ्यांवरच खर्च झाली पाहिजे; भांडवलदारांवर नाही, यामुळेच तुम्ही जितेंद्र आव्हाड यांना मत देणार नाही तर तुम्ही सेक्युलर आवाजाला, तुमच्यासाठी लढणाऱ्याला मत देणार आहात, हे विसरू नका. या ठिकाणी मी आवाहन करतोय की आव्हाड यांना एक लाखाचे मताधिक्य देऊन गद्दारांना उत्तर द्यावे, असे आवाहन कन्हैय्या कुमार यांनी केले.
काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रांताध्यक्ष अजय राय यांनी, हा देश गंगा जमुना संस्कृती पाळणारा देश आहे. ज्या गंगेत हिंदू अभ्यंगस्नान करतात; त्याच गंगेत मुस्लीम देखील वजू करतात. ही संस्कृती आपण तुटू देणार नाही. हे सरकार बेईमानीने जन्माला आले आहे. ते योजनेच्या माध्यमातून पैसे देऊन मते विकत घेतील. पण, ते पैसे त्यांचे नाहीत. आपलेच आहेत, हे लक्षात ठेवा आणि हे बेईमान सरकार उधळून लावा, असे आवाहन केले. तर,डॉ..जितेंद्र आव्हाड यांनी या प्रसंगी प्रथम क्रमांकाचे बटन दाबून आपणाला विजयी करावे, असे आवाहन केले.