त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवात महिलाभगिनींचा मोठा सहभाग
दिनेश मराठे
मुंबई : कार्तिक मासातील त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने वाळकेश्वर येथील बाणगंगेच्या तिरावर शुक्रवारी सायंकाळी 7:30 ते 9:30 च्या दरम्यान पार्वतीपते हरहर महादेव च्या जयघोषात महामंगल असा देह चित्त भान हरपणारा नयनरम्य दीपोत्सव आणि महाआरती सोहळा मोठया हर्ष उल्हासात संपन्न झाला.या मनाला सुखद आनंद देणाऱ्या महाआरती सोहळ्याचे आयोजन गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट आणि मुंबई महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
उत्तर प्रदेश येथील वाराणसी स्थित श्री काशी मठ संस्थानचे मठाधिपती साम्यमिंद्र तीर्थ स्वामीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यात अध्यक्ष प्रविण कानविंदे,सेक्रेटरी शशांक गुळगुळे आणि सीईओ प्रोजेक्ट ऋत्विक औरंगाबादकर यांनी उपस्थित सर्व भाविकांचे स्वागत केले.
यंदाच्या 11 व्या वर्षी त्रिपुरारी पूर्णिमा निमित्त वाळकेश्वर येथील बाणगंगेच्या तिरावर भाविकांच्या प्रचंड गर्दीत मोठ्या हर्षोल्हासात ढोलताशाच्या गजरात हर हर शंभो जय शिव शंभूच्या जय घोषात दीपोत्सव आणि महाआरती संपन्न झाली.या महाआरतीला मुंबईसह ठाणे, डोंबिवली,कल्याण,कर्जत,कसारा येथून लोकं आली होती.
बाणगंगेच्या दगडी पायर्यांच्या घाटावर बसलेल्या गंगाभक्तांच्या मुखातून हर हर महादेव आणि जय जय गंगे नमामी गंगे,हर हर शंभो जय शिव शंभूचा जयघोष सुरू होता.त्यात भगवी पताका डौलाने नाचवत ढोल ताशा पथकाने उपस्थित तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण केली होती.
बाणगंगा काठावर सर्वत्र गगनभेदी घोषणा
शंखनाद,केशरी ध्वज नृत्य, पाण्यात पोहणारे,बदकांचे थवे त्यात छोट्या 4 होड्यात फोटोसाठी छायाचित्रकारांची चाललेली लगबग,पायर्यावर बसलेली भाविक मंडळी पहायला मिळत होती.स्थानिक तरुण तरुणी, तर दूरवरून आलेले काही भाविक आपल्या पत्नी, लहानग्यांना घेऊन महाआरतीच्या जल्लोषात मग्न होती. त्यातही महिलांनी केलेला साजशृंगार सर्वांचे चित्त आकर्षित करीत होती. चारही बाजूंनी दिव्यांचा लखलखाट प्रकाशमान होत असल्यामुळे येथे दीपोत्सवाच्या सोहळ्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
बाणगंगेच्या किनारी उभारलेल्या खास सात स्टेजवर मंगलमय गणेश स्तुती,गंगा स्तुती, गीत गात सात षोडशी कन्या पारंपारिक वेषभूषा करीत भरत नाट्यम नृत्य करताना त्यांच्या चेहर्यावर आनंदोत्सव झळकत होता. पौरोहित्य सादर करीत असलेल्या मंगलमय श्रीगणेश वंदना,रुद्र सूक्त,पुरुष सुक्त,श्रीसूक्त आणि शांती पाठाच्या मंगलमय वेद मंत्राच्या घोषाने वातावरणात अगदी वाराणसी येथील गंगा आरतीचा अनुभव निर्माण करीत होते तर किनारी बसुन मुली आणि महिला गंगेत प्रज्वलन केलेले दीप सोडत होत्या.हे विलोभनीय वातावरणात अगदी भक्तिमय झाले होते.
हर हर महादेव या जयघोषात शिव तांडव स्तोत्र घेत उपस्थितांचे स्वागत केले गेले .प्रथम धूपारची, दीपारती आणि शेवटी महाआरती झाली.यावेळी सोहळे परिधान केलेले गळ्यातील रुद्राक्ष माला,भगवे अंगरखा या पारंपारिक वेषभूषा केलेले तरुण पुरोहित तालबद्ध होऊन महाआरती करीत होते.
भाविकांनी पार्वतीपते हरहर महादेव, गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम च्या जय घोषात सारा बाणगंगा परीसर भाविकांनी दुमदुमुन सोडला.त्यानंतर सुखकर्ता दुःखहर्ता, दुर्गे दुर्गटभारी, शिव तांडव स्तोत्र, पुरुष सूक्त,गंगा स्तुती, रामस्तुती,शिवपार्वती स्तुती आणि जल,वायू,आकाश, अग्नी आणि पृथ्वीचे आभार व्यक्त करीत वेद मंत्र,पौराणिक मंत्र म्हणत वातावरण एका दिव्य सोहळ्याचा आनंद भाविकांनी अनुभवला.
येथील स्थानिक बाणगंगा रहिवाशी महिला पुरुष यानी घाट सजविण्यात मोठे सहकार्य केले.येथील घाटावर जागो जागी काढलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या रांगोळ्यांच्या सड़याने मन मोहित होत होते.काही ठिकाणी तर झेंडू आणि गोंड्याच्या फुलांच्या रांगोळ्याही आपली सुन्दर छाप सोडत होत्या.
आपल्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालीत विवाहित महिला तसेच नवविवाहिता मंगळसूत्र, ठुशी,राणी हार, बोर माळ, लक्ष्मी हार,कोल्हापूरी साज, बकुळी हार, बांगडया, तोडे,कमरपट्टा, पैंजण,बाजूबंद,मुकुट, कर्णफूले,बुगडी,वाक,मासोळ्या,फुलांची वेणी, बिंदी,चंद्रकोर, नथ,नऊवारी शालू लेऊन आल्याने त्यांची उपस्थिती जणू स्वर्गातून अवतरलेल्या अप्सरा सारख्या जाणवत होत्या.त्यांचे फोटो शूट करताना फोटोग्राफर मग्न होते तर नटूनथटून साडय़ा ल्यायलेल्या लहान मुली पदर सावरत दिवे लावताना त्यांची सुरु असलेली लगबग साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.
दोन लहान मुलांनी प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांची वेषभूषा साकारत येथे वाळू पासुन निर्मित शिवलिंगाची पूजा केली.या राम लक्ष्मण जोडीच्या सोबत फोटो काढण्यास पोलीस अधिकारीही उत्सुक होते त्यांनी ही फोटो काढत आनंद व्यक्त केला.
प्रियंका सिंह आणि दिशा शर्मा या ठाण्याहुन बाणगंगा येथे प्रथमच आलेल्या तरुणीनी महाआरती मस्त एंजॉय केली असे त्या म्हणत हा सोहळा आयुष्यभर आमच्या मनात कायम कोरला गेला आहे असे म्हटले. पुढच्यावर्षी आम्ही पुन्हा येथे नक्कीच येऊ असे म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाला पारावर उरला नव्हता.
परिसरात जवळपास पाच हजार दिव्यांची रोशनाई करण्यात आली होती. वाराणसी मध्ये नियमित होणार्या सायंकालीन गंगा पूजन आणि महाआरती चा अनुभव येथे उपस्थितानी घेतला.
गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट वाळकेश्वर मंदिर यांच्याकडे मंदिराची मालकी असून ते या परिसराची देखरेख करते.दर त्रिपुरारी पौर्णिमेला येथे महाआरती केली जाते.दोन वर्षांच्या कोविड काळानंतर हे सलग दुसरे वर्ष भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेले होते.भाविकांनी याचि देही याचि डोळा महा आरतीचा सोहळ्याचा बाण गंगेच्या महोत्सवाचा आनंद घेत पुन्हा पुढच्यावर्षी येण्याचा संकल्प सोडला.
डोंबिवली येथून आलेल्या पवित्रा आर्ट विज्युअल्स इन्स्टिटयूटच्या नृत्यगुरु पवित्रा कृष्णा भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली हृदया साखरे,ग्रीषा शेट्टी,आराध्या पुजारी, ईशान्वी तोरस्कर,अनन्या नाडर, महिमा गंजी आणि अद्विता श्याम कृष्णन या इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थीनींनी नमः पार्वतीपते हरहर महादेवच्या जय घोषात रामस्तुतीपर भरतनाट्यम नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
हि बाणगंगा महाआरतीची संकल्पना सीईओ प्रोजेक्ट
ऋत्विक औरंगाबादकर ट्रस्ट बोर्ड समोर मांडली आणि यासाठी आरती कोअर कमिटीची स्थापनाकरून याची आयोजनाची संपूर्ण जबाबदारी स्विकारीत कोविड संक्रमण काळ वगळून सलग 11 वर्षे यशस्वीपणे आयोजन केले. यात अभाव राहिला तो येथे झालेल्या प्रचंड गर्दीच्या नियंत्रणाचा तरीही झोन दोन चे उपायुक्त मोहित गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली मलबार हिल पोलीस ठाण्याचे वपोनि शिंगाडे यांनी सहकाऱ्यांसह सर्वोत्तम बंदोबस्त ठेवत भाविकांच्या
यावेळी आर्किटेक्ट नियती औरंगाबादकर,प्रिती वणगे, बाळकृष्ण सुर्वे,अवधूत चव्हाण, संदेश पवार हे आरती कोअर कमिटीचे सदस्य प्रत्यक्षात कार्यरत होते.सुरज वालावलकर यांच्या जल सुरक्षा दलाचे जीवन रक्षक जवान तलावा भोवती तैनात होते.ऊर्जा फाऊंडेशन अध्यक्ष डॅा.विजय जंगम (स्वामी),मोहन अग्रवाल, सत्यनारायण श्रीमाली,चिंतन जैन,मंगला जाधव हे उपस्थित होते.
यावेळी नियती औरंगाबादकर यांनी म्हटले कि, एक भाविक म्हणून मला असे वाटते येथे प्रत्येक महिन्याच्या एकादशीला बांगणगा महाआरतीचे आयोजन करण्यात आल्यास लाखों भाविकांना त्याचा लाभ घेता येईल. आपली हिंदू सनातन संस्कृती,चालीरीती, श्रद्धा, आस्था यांचा वारसा आधुनिक भारताच्या येणाऱ्या नव्यापिढीला तसेच विश्वातून मुंबईत येणाऱ्या सर्व पर्यटकांना एक दिव्य नयनरम्य सोहळ्याची पर्वणी म्हणून अनुभवायला मिळेल. यावेळी त्यांनी काशी विश्वेश्वर मंदिराच्या धर्तीवर बांणगंगा तीर्थक्षेत्र विकसित होऊन कॉरीडॉर लवकरात लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारावे अशी भावना व्यक्त केली.