सहा प्रमुख पक्ष, अनेक आघाड्या यामधून महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटलेल्या सगळ्यांना उमेदवारी देणे शक्य नव्हते. त्यातच सहा प्रमुख पक्षांच्या आघाड्यांमध्ये जागावाटप करण्याची वेळ आल्याने जागा मर्यादित आणि इच्छुक अमर्यादित असे चित्र तयार झाले. अशा स्थितीत किती बंडखोर विजयी होतात, कितीजण आपल्याच नेत्यांना पाडतात आणि कितीजण आघाडी किंवा महायुतीला मारक ठरतात, हे 23 तारखेलाच स्पष्ट होईल.
शेतीची नीट निगा राखली नाही, तण वेळीच उपटले नाही, तर ते पिकांना मारक ठरत असते. बंडखोरीचे तणही असेच असते. सहा प्रमुख पक्ष, अनेक आघाड्या, असे पर्याय असूनही महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटलेल्यांची संख्याच इतकी झाली आहे, की त्यांना उमेदवारी देणे शक्य नव्हते. त्यातच सहा प्रमुख पक्षांच्या आघाड्यांमध्ये जागावाटप करण्याची वेळ आल्याने जागा मर्यादित आणि इच्छुक अमर्यादित असे चित्र तयार झाले. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंड थांबवण्यासाठी बाबापुता केला. मनधरणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी तर चार्टर्ड प्लेन पाठवून संबंधितांना मुंबईत बोलवून घेतले. शरद पवार स्वतः अनेक मतदारसंघातील बंडखोरांशी बोलले. उद्धव ठाकरे यांनी बंड खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. ठाकरे-पवार यांनी कोठेही मैत्रीपूर्ण लढती नाही, असे सांगितले. असे असूनही ठाकरे यांचे अनेक शिवसैनिक पवार यांच्याच पक्षाच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पवार यांच्या पक्षाच्या काही नेत्यांनी बंड करून स्वतःच्या पक्षाला अडचणीत आणले आहे. महायुतीमध्येही बंडखोरी आहे; परंतु जास्त बंडखोरी महाविकास आघाडीत आहे. त्यातल्या त्यात एक जमेची बाजू म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून आपले उमेदवार मागे घेतले. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे. उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झेंडा हाती घेणाऱ्यांनी पक्षश्रेष्ठी किंवा नेतेमंडळींच्या मनधरणीलाही दाद दिली नाही. पक्षश्रेष्ठींच्या जवळच्या असलेल्या नेत्यांनीही स्वहितासाठी पक्षहिताचा बळी दिल्याचे अनेक ठिकाणी दिसले. निवडणुकीचे रण तापले असताना या बंडखोरीची जोरदार चर्चा आहे.
उमेदवारी देताना काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाली. महायुतीतील मित्रपक्षाचे उमेदवार महायुतीच्याच उमेदवारांच्या विरोधात, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीत बिघाडी होऊन मैत्रीपूर्ण लढती होत असल्याचे चित्र दिसले. महाविकास आघाडीने समाजवादी पक्षाला दोन जागा दिल्या; परंतु त्यांचे अन्य चार उमेदवार महाविकास आघाडीविरोधात लढत आहेत. कोकणातील तीन जागा शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात आल्या; परंतु सांगोल्याचा तिढा सुटला नव्हता. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना परस्परांविरोधात लढत आहेत. सर्वाधिक चर्चा झाली, ती माहीम मतदारसंघाची. या मतदारसंघातून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तेथे महायुतीने उमेदवार देऊ नये, अशी भाजपची इच्छा होती. भाजपच्या नेत्यांनी मित्रपक्षाला विश्वासात न घेताच वक्तव्य केल्याने आता घूमजाव करण्याची वेळ आली. सुरुवातीला भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आमचा पाठिंबा हा शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनाच असेल, असे स्पष्ट केले. त्यापाठोपाठ राज ठाकरे यांच्याशी उत्तम वैयक्तिक संबंध असलेल्या आशिष शेलार यांनीही घूमजाव केले. महायुतीचे उमेदवार आता सरवणकरच आहेत आणि महायुतीचा उमेदवार तोच आमचा उमेदवार अशी भूमिका शेलार यांनी घेतली. भाजपच्या नेत्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सरवणकर यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका घेतली असली, तरी प्रत्यक्षात निवडणुकीत भाजपची मते कुठे जाणार, हे पाहावे लागेल.
राज ठाकरे यांचे भाजपच्या अनेक नेत्यांशी उत्तम वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे माहीम विधानसभा निवडणुकीत मनसेला पडद्यामागून गुप्तपणे रसद पुरवली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहीममध्ये शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्याने आता मुंबईतील बारा मतदारसंघांमध्ये मनसे कडवा प्रतिकार करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या चर्चेत अडथळा ठरलेल्या रामटेकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराविरुद्ध काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांनी अर्ज कायम ठेवला आहे. अकोला पश्चिममध्ये ‘वंचित’चे अधिकृत उमेदवार डॉ. झिशान हुसेन यांनी माघार घेतल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीत महायुतीमधील भाजप बंडखोर अंबरीशराव आत्राम यांनी अर्ज कायम ठेवला आहे. तेथे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान मंत्री धर्मरावबाबा आत्राम रिंगणात आहेत. काटोलमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील यांच्या विरुद्ध काँग्रेसचे याज्ञवल्क्य जिचकार रिंगणात आहेत. अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात भाजप नेते तुषार भारतीय यांनी बंड केले आहे. विशेष म्हणजे भाजपने ही जागा राणा यांच्यासाठी सोडली होती आणि राणा यांच्या पत्नी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढल्या होत्या. दर्यापूर मतदारसंघात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात राणा यांच्या युवा स्वाभिमानचे रमेश बुंदिले रिंगणात आहेत.
इकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील बारापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीच्या, तर चार मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी बंडखोरी केली आहे. केवळ संगमनेर, कोपरगाव, कर्जत-जामखेड या तीन मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली नाही. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणार असे चित्र स्पष्ट झाले तर माढा येथून आमदार बबनराव शिंदे यांनी माघार घेतल्याने येथे चुरशीची तर माळशिरसमध्ये दुरंगी लढत होणार आहे. सांगोला येथे शिवसेनेने (ठाकरे) दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली आणि अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज कायम ठेवला. ही जागा शेकापला सोडली जाते. येथे शेकापने डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली. सांगली जिल्ह्यात सांगली, खानापूरसह जतमध्ये बंडखोरी कायम आहे. विशेषत: सांगलीमध्ये काँग्रेसच्या जयश्री पाटील यांच्या बंडखोरीमुळे माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची कोंडी झाली आहे. मराठवाड्यातील घनसावंगीमधून शिवाजी चोथे, बीडमध्ये ज्योती मेटे, आष्टीमध्ये भीमराव धोंडे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवले. नांदेडमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली. लातूर आणि धाराशिवमध्ये बंडखोरी शमवण्यास नेत्यांना यश मिळाले. जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बंडखोरी करू असे सांगणाऱ्या बहुतेकांनी अर्ज परत घेतले. आष्टी मतदारसंघात ‘महायुती’मध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे.
मराठवाड्यातील 46 मतदारसंघांपैकी 20 जागा भाजप लढवत असून एकनाथ शिंदे गट 16 तर राष्ट्रवादी अजित पवार गट 9 जागा लढवत आहे. गंगाखेडमधील अपक्ष उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना महाविकास आघाडीने पुरस्कृत केले. महायुतीमध्ये आष्टी मतदारसंघातून प्रताप आजबे आणि भाजपचे सुरेश धस या दोघांना अधिकृत ‘एबी’ फॉर्म दिला गेल्याने मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा तिढा कायम राहिला आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने, सातपैकी सहा मतदारसंघांमध्ये युती आणि आघाडीमध्ये बिघाडी कायम राहिल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यातील 21 पैकी आठ मतदारसंघांमध्ये बंडखोरी कायम राहिली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीला बाकी ठिकाणी बंडखोरांची मनधरणी करण्यात यश आले आहे. मावळ, भोर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, चिंचवड आणि पुण्यातील पर्वती, कसबा आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे. यात पुण्यातील चार मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे बंडखोर उभे आहेत.
नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी काही ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही बंडखोरीचा फटका बसणार आहे. चांदवडमधून भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांना त्यांचेच बंधू केदार आहेर यांनी आव्हान दिले आहे. नांदगावमध्ये शिवसेनेचे (शिंदे) सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे (अजित पवार) समीर भुजबळ उभे आहेत. देवळालीमध्ये तांत्रिक कारणामुळे शिवसेनेच्या (शिंदे) राजश्री अहिरराव यांची उमेदवारी राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवार सरोज अहिरे यांच्याविरोधात कायम राहिली. जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमध्ये शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार डॉ. सतीश पाटील यांच्या विरोधात, अजित पवार गटाचे डॉ. संभाजीराजे पाटील तसेच भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील यांनी शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार अमोल पाटील यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. अशा स्थितीत किती बंडखोर विजयी होतात, किती आपल्याच पक्षाच्या नेत्यांना पाडतात आणि कितीजण आघाडी किंवा महायुतीला मारक ठरतात, हे 23 तारखेलाच स्पष्ट होईल.