‘धर्मराज्य पक्षा’चा १३वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

अनिल ठाणेकर

ठाणे : महाराष्ट्रहित जोपासण्यासाठी व महाराष्ट्रधर्म राखण्यासाठीच, ‘धर्मराज्य पक्षा’ने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पाठींबा दिला असल्याचे पक्षाध्यक्ष  राजन राजे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, सचिव जयेंद्र जोग, सहसचिव नरेंद्र पंडित, खजिनदार अजित सावंत, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, सचिन शेट्टी, ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण; तसेच, पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि कामगार संघटनेचे कामगार सदस्य व कामगार युनिट प्रतिनिधी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये, भाजपला निसटता विजय मिळालेला असल्यामुळे, त्यांचा ‘चारशे पार’चा बार फुसका निघालेला आहे. मोदी-शहा यांच्या रासवट राजकीय प्रवृत्तीविरोधात, भारतीय जनतेमध्ये उसळलेला जनक्षोभ उसळल्यामुळेच भाजपला त्यांची जागा दाखविण्यात काही अंशी यश आलेले असले तरी, येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, महायुती सरकारला राज्यातून संपूर्ण नेस्तनाबूत करावेच लागणार आहे. ज्यापद्धतीने भारतीय जनता पक्षाने, शिवसेनेचे ४० आमदार फोडून, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या नावाखाली आपले ‘मिंधे’ बनवून, उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसला, हा महाराष्ट्रद्रोही आणि महाराष्ट्रधर्म बुडविणाऱ्या गद्दारांना, आपल्या ताटाखालची पोकळ सत्ताधारी मांजरं बनविणाऱ्या ‘गुजराथी-लॉबी’नेच घडविलेला हा, संतापजनक आणि अश्लाघ्य प्रकार असल्यामुळेच, निव्वळ महाराष्ट्रहित जोपासण्यासाठी व महाराष्ट्रधर्म राखण्यासाठीच, ‘धर्मराज्य पक्षा’ने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पाठींबा दिला आहे. मालवणात शिवरायांचा तकलादू पुतळा उभारुन, समस्त मराठी जनतेच्या अस्मितेच्या केलेल्या, घनघोर श्रेणीतल्या अपमानाचा सूड, येत्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात, जनता-जानार्दनाकडून नक्कीच उगवला जाईल, असा प्रखर आशावाद ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी यावेळी बोलून दाखवला.

भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी सर्वमान्य ओळख असलेला आणि कामगार कष्टकरीवर्गाचा बुलंद आवाज असणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’चा १३वा वर्धापनदिन, नुकताच पक्षाच्या ठाणे कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वर्धापनदिनाचे औचित्य साधून, ‘धर्मराज्य दिनदर्शिका-२०२५’ या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशनदेखील राजन राजे यांच्याहस्ते संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *