काहीतरी नवीन…
श्याम तारे
मुलांच्या हाती मोबाईल देणे हे आता सामान्य झाले असले तरीही त्याचे दुष्परिणाम मुलांवर होतात की नाही यावर सध्या वाद-विवाद सुरु आहेत. काहींच्या मते हे नवे तंत्रज्ञान आहे आणि ते हळू हळू पचनी पडेल त्यामुळे विचलित होण्याचे कारण नाही. इतरांचे म्हणजे मोबैल्चा अतिवापर धोक्याचा आहे असे मानणाऱ्या लोकांचे म्हणणे असे की आज मुले मोबाईलमध्ये चेहरा घुसवून बसलेली असतात, ती काय बघतात हे कधी तरी आपण तपासून पाहिले आहे का? अनेकांचे उत्तर यावर नकारार्थी असेल. परंतु वैज्ञानिकांनी मात्र या विषयाचा पाठपुरावा केला आहे आणि आता सबळ पुरावे असे दिसत आहेत की मोबाईल आणि त्यामधून पेरले जाणारे समाज माध्यम निदान वाढत्या वयाच्या मुलांसाठी घातक आहे. हा विचार करूनच असेल जगातील एका देशाने १६ वर्षाखालील मुलांसाठी समाज माध्यमांवर प्रतिबंध घालण्यासाठी विचार सुरु केला आहे.
समाज माध्यमे हा आजकाल आपल्या शहरी अथवा ग्रामीण जीवनाचा देखील अविभाज्य भाग बनलेला आहे हे आपण जाणतो. परंतु अनेक तरुणांना या विषयाबद्दल कुणी संशोधन केलेले पसंत का पडत नाही हे सहज समजता येईल.
आज मोठ्या मंडळींपेक्षा मुलांना आपल्या भविष्याची काळजी अधिक वाटते असे आढळले आहे. पूर्वी विद्यार्थी केवळ अभ्यासाठ किंवा खेळात असायचे. काळजी हा प्रश्न त्यांच्यापुढे सामान्यपणे उभा केला जात नसे. या कारणामुळे मुले आज अधिक निराश झालेली दिसतात. पूर्वी गुण कमी पडले तर पालकांचा मार पडत असे परंतु आज मुलांनाच आपल्याला गुण कमी पडू नयेत यासाठी सतर्क राहावे लागते. त्यातून त्यांचा कल स्वत:वर केंद्रित होतो आणि त्यासाठी मोबाईल हे उत्तम माध्यम असते.
समाज माध्यमांचा नकारात्मक परिणाम होण्यासाठी अनेक कारणे असतात. कोणतीही योग्य गोष्ट आत्मसात करायला वेळ लागतो परंतु अयोग्य गोष्टी मात्र मनाला ताबडतोब चिकटतात पण निघता निघत नाहीत हा तर निसर्ग नियम आहे. पूर्वीच्या काळी समाज माध्यमांचा परिणाम शोधण्यासाठी सुयोग्य साधने नव्हती, त्यामुळे त्यावेळी समाज माध्यमांना झुकते माप मिळाले. परंतु त्यातील एकात तर ९० लाख मुलांशी संवाद साधल्याचा उल्लेख होता आणि चुकीचे काही नाही असा निष्कर्ष…आता बोला… एक शीर्षक तर खूपच बोलके होते…”मोबाइल वरील मुलांचा वेळ बटाट्याचे वेफर्स खाण्यापेक्ष जास्त घातक नाही…”.
मोबाईल आणि त्यावरील समाज माध्यमे ही मुलांची मने त्यांच्या आणि मोबाईलच्या दुहेरी संवादात गुंफलेली असतात. त्यामुळे त्यांचे लक्ष पडद्यावर केंद्रित होते आणि त्यातून नैराश्य आणि काळजी वाढते. सेल्फी काढणे आणि त्या ‘शेअर’ करणे यामधून द्वेषाची भावना उत्पन्न व्हायला मदत होते आणि ते या वयात घातकच मानायला हवे. यामधूनच मुलांमध्ये कोणत्याही कामात चालढकल करण्याचा प्रकार समोर आला. पूर्वी काम सांगितले की ते तत्परतेने केले जायचे. आज सांगून बघा…उत्तर येईल ताबडतोब परंतु काम होईलच याची खात्री देता येणार नाही. या वयात कोणत्याही प्रकारचे समाधान मिळण्यापासून वंचित राहणे यासारखी मानसिक जाणीव नसते. त्यातून आणखी काही नकारात्मक उत्पन्न होऊ शकते.
तेव्हा सावध राहणे आणि मुलांना वेळीच सावध करणे हेच आपल्या हाती आहे…
प्रसन्न फीचर्स
