लक्षवेधी

शंतनु चिंचाळकर

गेले पाच महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अंतराळवीर महिलेचे अलीकडेच प्रसिध्द झालेले फोटो चिंताअ वाढवणारे आहेत. चेहरा आणि शरीरयष्टी पाहता कॅलरीजच्या कमतरतेमुळे एकूणच तिचे वजन कमी झाल्याचे जाणवते. अत्यंत कमी गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत जगणे जिकीरीचे असल्याने अंतराळातील वास्तव्य अजून वाढणे तिच्या प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकते.

५ जून २०२४ रोजी भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी बुच विल्मोर हे दोघे अंतराळवीर बोईंग स्टारलायनरच्या चाचणीच्या मोहिमेसाठी अंतराळात गेले. त्यांनी जुलैमध्ये स्पेस स्टेशनवर पोहोचल्यानंतर घेतलेल्या एकमेव पत्रकार परिषदेत लोकांना ते आपल्या कामात व्यस्त आहेत, दुरुस्ती आणि संशोधनात मदत करत आहेत आणि स्टारलाइनरच्या चाचण्यांमधून फलद्रूप असे परिणाम मिळतील, असा विश्वास व्यक्त केला होता. तेव्हा त्यांचा 13 जून 2024 रोजी परतण्याचा निर्णय झाला होता. पण दुर्दैवाने हे दोघे अंतराळ स्थानकात अडकले आहेत. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर जूनमध्ये बोईंगच्या नवीन स्टारलाइनरवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. तथापि, डॉकिंग करण्यापूर्वी फ्लाइटला हेलियम गळती आणि थ्रस्टर निकामी होण्याच्या समस्येने ग्रासले. नासाच्या वैज्ञानिकांनी यानातील बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही अखेर दोन्ही अंतराळवीरांना न घेताच यान पृथ्वीवर परतले आणि त्यांचा आठ दिवसांचा कार्यकाळ आता फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या अनिश्चित मुक्कामात काळात बदलला आहे. त्यामुळे त्या दोघांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील जीवन धोक्यात आहे. नासाने दिलेल्या ग्वाहीनुसार अंतराळवीर अवकाशात अडकलेले नाहीत आणि त्यांना स्टारलाइनरमध्ये परत आणण्यात कोणताही धोका नाही. परंतु नासाने त्यांना स्पेसएक्स फ्लाइटमध्ये परत आणण्याचा विचार केला. स्पेस एक्स ही एक खाजगी स्पेसफ्लाइट कंपनी आहे, जी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर क्रूसह उपग्रह आणि लोकांना अंतराळात पाठवते.
स्टारलाइनरसोबत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आणणे धोकादायक असल्यामुळे फक्त स्टारलाइनरला पृथ्वीवर आणण्यात नासाला यश मिळाले आहे. स्टारलाइनर पृथ्वीवर यशस्वीपणे परतल्याची माहिती मिळाल्यानंतर सुनीता अत्यंत भावूक झाल्या. त्यांनी अंतराळातून आपण खुशाल असल्याचा मेसेज पाठवला आहे. सुनीता विल्यम्स यांनी पंजाब विद्यापीठातून 1982 मध्ये एरॉनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे 1984 मध्ये अर्लिंग्टन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन, त्यांनी कॉलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून 1988 मध्ये डॉक्टरेट मिळवली. आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (195 दिवस) विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. तसेच त्यांच्या नावावर सगळ्यात जास्त (7 वेळा) आणि जास्त वेळ (50 तास, 40 मिनिटे) अंतराळात चाललेल्या महिला म्हणून विक्रम आहे. 1993 मध्ये त्या नौदल चाचणी पायलट बनल्या आणि नंतर त्या स्वतः चाचणी पायलट प्रशिक्षक बनल्या. 30 पेक्षा जास्त विमाने उडवून त्यांनी 2,770 पेक्षा जास्त तासांचे लॉग इन केले. अंतराळ मोहिमेसाठी निवडल्यावर त्या यूएसएस सायपनवर तैनात होत्या. 1995 मध्ये त्यांनी मेलबर्नमधील फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापनात एमएस पूर्ण केले आणि 1998 मध्ये अंतराळवीर प्रशिक्षणात प्रवेश केला. त्यांनी मॉस्कोमध्ये रशियन फेडरल स्पेस एजन्सीसोबत काम करताना रोबोटिक्स आणि इतर ऑपरेशनल तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले.
असा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि नौदलाचे कौतुक पदक, नेव्ही, मरीन कॉर्प्स अचिव्हमेंट मेडल, मानवतावादी सेवा पदक, नासा स्पेसफ्लाइट पदक, अंतरिक्ष संशोधनातील गुणवत्तेसाठी, रशिया सरकार (2011), पद्मभूषण, भारत सरकार (2008), मानद डॉक्टरेट, गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठ (2013), गुणवत्तेसाठी गोल्डन ऑर्डर, स्लोव्हेनिया सरकार (2013) अशा मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या सुनिता विल्यम्सचा अंतराळात अनिश्चित काळासाठी मुक्काम वाढणे ही बाब खचितच चिंताजनक आहे. अंतराळातून आलेल्या विल्यम्स यांच्या अलीकडील प्रतिमा पहिल्यास त्यांचे वजन कमी झाल्याचे जाणवत आहे. अंतराळ मोहिमेवरील अंतराळवीरांसाठी एक सामान्य समस्या असते. अंतराळात, सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणात राहताना शरीराची प्रकृती राखणे आव्हानात्मक असते. अशा वेळी शरीर पोषक तत्वांचे चयापचय कसे करते आणि उर्जेचा वापर कसा करते यावर प्रकृती अवलंबून असते. सिएटल येथील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विनय गुप्ता यांनी अलीकडील फोटोंवरून केलेल्या निरिक्षणातून विल्यम्स यांचे गाल काहीसे खोलगट झाल्याचे दिसून आले. हे अनेकदा शरीराचे एकूण वजन कमी झाल्याचे लक्षण असते. यावरून विल्यम्स यांच्या शरीरात कॅलरींची कमतरता आहे, हे स्पष्ट होते, शिवाय त्यांच्या शरीरातील कॅलरी कमी होत आहेत असा निष्कर्ष निघतो. म्हणूनच सुनिता विल्यम्स यांचे अंतराळातील वास्तव्य वाढणे त्यांच्या प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकते.
डॉ. विनय गुप्ता पुढे म्हणतात की, अंतराळातील वातावरण आणि दबावाखालील केबिन यामुळे मानवी शरीरावर अनोखा ताण पडतो. अंतराळवीरांना वाढलेल्या उच्च-उंचीवर राहण्याच्या शारीरिक परिणामांचा सामना करावा लागतो. त्यात बदललेल्या वातावरणात हृदय, रक्तवाहिन्या आणि श्वसनमार्ग यांच्या कार्याचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, अंतराळ प्रवासामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते; ज्यामुळे संभाव्य आजार अंतराळवीरांना अधिक असुरक्षित बनतात. डॉ. गुप्ता यांनी ठळकपणे सांगितले की वजन कमी होणे, विशेषत: गाल खोल जाणे हे अंतराळवीराचे कॅलरी सेवन शरीराच्या वाढीव ऊर्जेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अपुरे असल्याचे दृश्यमान सूचक आहे. अंतराळात पृथ्वीच्या निम्न कक्षेत फिरत असलेल्या अवकाश स्थानकांमध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाची स्थिती असते. अत्यंत कमी गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळवीर स्थानकांमध्ये अक्षरशः तरंगत असतात. अशा परिस्थितीत जगणे अत्यंत जिकरीचे असते. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे मानवी शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम होतात हे सर्व सुनीता विल्यम्स यांच्या फोटोंमधून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच जगभरातील, विशेषतः भारतातील खागोलप्रेमी चिंतेत पडले आहेत.
इस्रोने 2024 साठी ‌‘गगनयान‌’ हा भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम जाहीर केला होता. या मोहिमेचा प्राथमिक उद्देश म्हणजे आपल्या मानवी संघाला तीन दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावरील कक्षेत अंतराळात नेणे. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी, इस्रोने मानवी प्रवासासाठी प्रमाणित प्रक्षेपण वाहन, लाइफ सपोर्ट सिस्टीम आणि क्रूसाठी आपत्कालीन सुटका प्रोटोकॉल यासह महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले. गगनयान मोहिमेने देशाच्या तांत्रिक प्रगतीचे दर्शन घडवत अंतराळ संशोधनात भारताच्या वाढीचा प्रवास नवीन उंचीवर पोहोचवला आहे. हे एक यशस्वी मिशन भारताला अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या राष्ट्रांमध्ये मानवी अंतराळ उड्डाण क्षमतेसह स्थान देईल. पण भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळात वाढलेल्या मुक्कामाने भारताची ही गगनयान मोहीम 2026 पर्यंत सुरक्षा चाचणीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. अंतराळात क्रू सुरक्षेची खात्री करण्यासाठी डिसेंबरमध्ये गगनयानाची चाचणी घेतली जाईल. कारण अंतराळवीरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही जोखीम घेतली जाणार नाही, असे इस्रोने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर सुनिता विल्यम्सच्या लांबलेल्या परतीचा तपशिलवार अभ्यास करावा लागणार आहे. त्यांची परतीची यात्रा सफल व्हावी लागणारच आहे, पण त्यातून पुढे येणारे निष्कर्ष आणि नोंदी पुढील प्रवासासाठी मौल्यवान ठरणार आहेत.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *