मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली
उल्हासनगर : मतदानाची प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा,सुव्यवस्था आणि शांतता अबाधित ठेवण्याकरिता ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी कंबर कसली आहे.त्यासाठी उल्हासनगर पोलीस परिमंडळात येणाऱ्या 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोन कॅमेऱ्यांचा वॉच सज्ज करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त सचिन गोरे,उल्हासनगरचे सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी,अंबरनाथचे सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांचे मार्गदर्शन व देखरेखीखाली उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे,मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे,विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ,हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप,अंबरनाथ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे,शिवाजी नगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील,बदलापूर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर,बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी 3 असे 24 ड्रोन कॅमेरे सज्ज केले आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे.हवेतून शहरावर बारीक नजर ठेवून कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना टाळण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.कोणत्याही संशयास्पद हालचाली,मोठ्या प्रमाणावर गर्दी,अनुचित वर्तन लगेच पकडण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे.या तंत्रज्ञानामुळे वेळेवर संभाव्य गुन्हे रोखणे सुलभ होणार आहे.
मतदानाच्या दिवशी देखील पोलिसांचा हा “डिजिटल डोळा” अधिक प्रमाणात ऍक्टिव्ह सतर्क राहणार आहे.मतदानाच्या काळात गर्दीचे नियोजन,कोणत्याही प्रकारचे राजकीय दबाव,किंवा कायदा सुव्यवस्थेचा भंग यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे ड्रोन प्रभावी ठरणार आहेत.
ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून येत असून नागरिकांनी पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले आहे.दरम्यान विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही परिसर संवेदनशील असून या परिसरातील गुंडगिरी आणि गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी रूटमार्चची विशेष मोहिम राबवली आहे.
