भारतात पुढील महिन्यात दळणवळण क्षेत्रात क्रांती येणार आहे. देशात रस्त्यांचे जाळे घट्ट आहे. आता रेल्वेचे जाळेही दाट करण्यावर मोदी सरकारने भर दिला आहे. त्यातच पुढील महिन्यात हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन भारतीय रेल्वेच्या ताफ्यात दाखल होत आहे. पर्यावरणाला अनुकूलतेसोबतच ही रेल्वे प्रवाशांसाठी आरामदायक असल्याचा दावा करण्यात येत आहे. डिझेल आणि वीजेशिवाय ही ट्रेन धावेल. 2030 पर्यंत झिरो कार्बन उत्सर्जन करण्यासाठी भारताचे हे पाऊल महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. यामुळे रेल्वेची गतीशीलता वाढेलच; पण पर्यावरण जपण्यातही मोलाचा हातभार लागेल.
ही देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन असेल. ही ट्रेन वीज तयार करण्यासाठी प्राथमिक स्त्रोत म्हणून पाण्याचा वापर करेल. पारंपारिक डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिनऐवजी ही रेल्वे हायड्रोजनचा वापर करेल. ही रेल्वे हायड्रोजन इंधन सेल, ऑक्सिजनसह मिळून वीज तयार करेल. त्यातून वाफ आणि पाणी उत्सर्जित होईल. पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. हायड्रोजन रेल्वे हा भारतीय रेल्वेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कार्बन फूटप्रिंट आणि डिझेल इंजिनमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करणे असा त्याचा उद्देश आहे. हायड्रोजन इंधन सेलचा उपयोग केल्याने ट्रेन कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि पार्टिकुलेट मॅटर उत्सर्जित होणार नाही. प्रवासासोबतच पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही.
हायड्रोजन रेल्वे केवळ पर्यावरणनुकूल आहे असे नाही, तर तिच्यामुळे ध्वनिप्रदूषणही कमी होईल. डिझेल रेल्वेमुळे ध्वनी प्रदूषण होते. त्या तुलनेत ही ट्रेन 60 टक्के कमी आवाज करेल. देशभरात रेल्वे विभाग अशा 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याच्या विचारात आहे. भारतीय रेल्वे एक स्वच्छ, शांत आणि स्वस्त पर्याय देण्याच्या विचारात आहे. हायड्रोजन ट्रेनचा पहिला पायलट प्रकल्प हरयाणातील जींद-सोनीपत या रेल्वे मार्गावर होईल. ही ट्रेन 90 किलोमीटरचे अंतर कापेल. यासोबत दुर्गम भागात, पर्यटनस्थळावर ही रेल्वे धावेल. यामध्ये दार्जिलिंग, हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटेन रेल्वे, कालका-शिमला रेल्वे अशा ठिकाणांचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *