रक्तपेढ्या केंद्रांना सक्त ताकीद; ऐच्छिक रक्तदानावर भर

मुंबई : रक्तदान शिबिरात हेल्मेट, हेडफोन आणि ब्लूटूथ यांसारखी उपकरणे व इतर वस्तू देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहित केले जाते. हे ऐच्छिक रक्तदानाच्या मूलभूत तत्त्वांना मूठमाती देणारे असल्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) कठोर निर्देश देताना सर्व रक्तपेढ्या आणि रक्तदान शिबिर आयोजकांना भेटवस्तू देण्यास मनाई केली आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास कडक कारवाईचा इशाराही परिषदेने दिला आहे.

रक्त शिबिरांची माहिती देण्यासाठी सर्रास होर्डिंग, बॅनर उभारले जातात. त्यावर भेटवस्तू देण्याचे प्रलोभन दिले जाते. रक्तदात्यांची गर्दी जमवण्यासाठी हे सर्रास केले जात असल्याचा आरोप केला जात होता. या पार्श्वभूमीवर परिषदेने हे आदेश जारी केले आहेत. वाढदिवस, स्मृतिदिनांसह काही प्रसंगी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, मंडळांकडून ऐच्छिक रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. शिबिरांत रक्तदानासाठी रक्तपेढ्या आणि रक्त संकलन केंद्रांशी संपर्क साधला जातो. या रक्तदान शिबिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रक्तदात्यांची संख्या वाढवण्यासाठी पिशव्या, कूपन, छोटे मोबाईल, ब्लूटूथ हेडसेट, ब्लूटूथ स्पीकर, स्वयंपाकघरातील भांडी, क्रोकरी सेट, घड्याळे, पेन, थर्मास, बाटल्या आदी भेटवस्तूंचे वाटप केले जाते, हे अनेकदा निदर्शनास आले आहे.

दरम्यान, भेटवस्तूंच्या आशेने अनेक रक्तदाते रक्तदानासाठी येत होते, मात्र आता भेटवस्तूंचे वाटप करण्यास मनाई करण्यात आल्यामुळे रक्तदात्यांची संख्या कमी होण्याची भीती सामाजिक संस्था व्यक्त करत आहेत.

हमीपत्र द्यावे लागणार जारी केलेल्या नव्‍या परिपत्रकानुसार रक्त केंद्रे आणि रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या संस्थांना शिबिरापूर्वी भेटवस्तू देणार नाहीत, असे हमीपत्र द्यावे लागणार आहे.  रक्तदान शिबिरांच्या नोंदी पाच वर्षांपर्यंत ठेवाव्या लागणार आहेत. आवश्यकतेनुसार राज्य रक्त संक्रमण परिषद आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी केली जाईल.

 

 भेटवस्तू मिळवण्याच्या लोभापोटी काही रक्तदाते या आजाराची माहिती लपवून आणि निर्धारित दिवसांचे पालन न करून रक्तदान करण्यासाठी येतात. हे अत्यंत चुकीचे आहे. रक्तदानाची परिस्थिती भविष्यात बिघडू नये, यासाठी परिषद कठोर कारवाई करेल.

– डॉ. महेंद्र केंद्रे, सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *