मुंबई : बटेंगे तो कटेंगे घोषणा देणारेच समाजात फूट पाडून विभाजन करण्याचे काम करत आहेत. प्रचार संपताच सत्ताधारी भाजपा युतीकडून फेक नेरेटीव्ह पसरवले जात आहे. धारावीतील एका मंदिरासंदर्भात खोटे सांप्रदायिक पोस्टर लावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका रात्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोस्टर कशी लागली? पोलीस काय करत होते? असा संतप्त सवाल करून निवडणूक आयोगाने निष्पक्षपातीपणे चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार यांनी केली आहे.
यासंदर्भात खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मंदिर पाडण्याची कोणतीही नोटीस नसून जवळच्या एका गेटसाठी ही नोटीस देण्यात आली आहे, असे असताना खोटी पोस्टर लावून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही नोटीस भाजपा युतीच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगर पालिकेने दिली आहे मग मंदिराच्या विरोधात भाजपा युतीच आहे असे मानायचे का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदर्श आचारसंहिता सुरु असताना महापालिकेने नोटीस कशी काय पाठवली? निवडणुका कोणासाठी आहेत, कोण सेफ आहे हे राहुल गांधी यांनी जाहिरपणे सांगितले आहे. निवडणुका संविधानाच्या माध्यमातून होत नसून एका व्यक्तीसाठी सुरु आहेत. धारावीची जनता सुज्ञ आहे, ते भाजपा शिंदे युतीच्या फेक नेरेटिव्हला बळी पडणार नाहीत असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
लोकनेते एकनाथ गायकवाड व वर्षा गायकवाड यांचे धारावीच्या जनतेशी काय नाते आहे, हे धारावीकरांना माहित आहे. विरोधकांच्या घरावरही कारवाई करण्याची आमची भूमिका नाही. त्यामुळे मंदीर, मशिद, प्रार्थना स्थळ पाडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजपा युतीने खोट्या गोष्टी पसरवून लोकांची दिशाभूल करण्यासाठी अत्यंत खालची पातळी गाठलेली आहे. सिद्धिविनायक मंदिरासंदर्भातही कालच खोटी माहिती पसरवण्यात आली आहे. निवडणुकीत पराभव होत असल्याची जाणीव भाजपा शिंदे युतीला झाल्याने जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
0000
