अनिल ठाणेकर
ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी,.२० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता मतदान सुरळीतपणे पार पडणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने बाजार व जत्रा अधिनियम, १८६२ चे नियम ५ ग अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी, मतदानाचा दिवस असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता ठाणे जिल्ह्यातील, ठाणे: करावे गाव, गावदेवी मैदान, से.36, नवी मुंबई आणि मुंब्रा बाजारपेठ व कौसा बाजारपेठ, कल्याण: मांडा, भिवंडी: दुगाड, खारबाव, कोपर, वडवली तर्फे राहूर, राहणाळ, घोलगाव, शहापूर: पिवळी, शेणवे, मळेगाव, टेंभूर्ली (खराडे, चांग्याचा पाडा) या ठिकाणांवर भरणारा आठवडा बाजार किंवा जत्रा बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हादंडाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी डॉ.संदीप माने दृकश्राव्य माध्यमांनी (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडिया) अशा बातम्या प्रदर्शित करु नयेत. तसेच राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली ठाणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निर्भयपणे, मुक्त वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक पोलीस यंत्रणा व केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान सज्ज आहेत. मतदानादिवशी मतदान केंद्रांवर कोणतीही गर्दी होणार नाही व सर्व मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी सर्व केंद्रीय सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिक पोलीस यंत्रणांनी दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना मतदान केंद्रात मार्गदर्शन करून त्यांचे मतदान जलदगतीने होईल, याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच मतदान केंद्र व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणावरील विषयाबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात पार पडली. या बैठकीस संबंधित सर्व केंद्रीय निवडणूक निरीक्षक, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख, कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर यांच्यासह सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, गुजरात पोलीस, गोवा पोलीस, छत्तीसगड पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते.स्थानिक पोलीस दलाबरोबरच मतमोजणी केंद्रांवर तसेच मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या जवानांनी मतदान केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. सर्व नागरिकांना तसेच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदान खोलीमधील व्यवस्थापन सुरळीत होईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. मतदानासाठी रांगेचे व्यवस्थापन तसेच गर्दीचे व्यवस्थापन करताना स्थानिक पोलीस यंत्रणांबरोबरच केंद्रीय सुरक्षा यंत्रणाची मदत होईल. तसेच संवेदनशील व गर्दी होणाऱ्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आले असल्याचे श्री. शिनगारे यांनी यावेळी सांगितले.ईव्हीएमची वाहतूक तसेच स्ट्रॉंगरुमची सुरक्षा व्यवस्थाही चोखपणे ठेवण्यात आली असून केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना अर्लट मोडवर राहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत.मतदान केंद्राच्या परिसरात अपुरी जागा असेल तेथे विशेष काळजी घेण्याचे निर्देश यावेळी केंद्रीय निरीक्षकांनी दिले. तसेच गर्दी होणाऱ्या ठिकाणी, जेथे मतदारांची जास्त रांगा लागतात अशा परिसरात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात यावेत. मतदान प्रक्रियेसंदर्भात अथवा मतदानास उशीर होत असल्यासंदर्भात कोणतीही अफवा पसरवू नये, यासाठी सोशल माध्यमांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही केंद्रीय निरीक्षकांनी यावेळी दिले. प्रत्येक मतदान केंद्रांवर पुढील तास महत्त्वाचे असून अवैध मद्य वाहतूक, अवैध रोकड वाहतूक आदींवर भरारी पथकाने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही केंद्रीय निरीक्षकांनी यावेळी दिल्या. ठाणे शहर व जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा प्रमाणात सुरक्षा यंत्रणांची तैनात करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील तसेच गर्दीच्या ठिकाणीही योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर तसेच मतदानाच्या रांगेत गर्दी होऊ नये, मतदारांना लवकरात लवकर मत देता यावे, यासाठी मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांबरोबरच पोलीस यंत्रणाही सर्वतोपरी मदत करणार आहे. संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे तसेच अरुंद रस्ते असलेल्या ठिकाणी ड्रोन, सीसीटीव्ही, विशेष पथकाद्वारे लक्ष ठेवण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त डुंबरे यांनी यावेळी सांगितले.
चौकट
ठाणे जिल्ह्यात २८ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगामार्फत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहिता काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनामार्फत कठोर कारवाई करण्यात येते. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमधून एकूण २८ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १६ कोटी ५९ लाख ४ हजार रोख रक्कम, ३ कोटी ३२ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा,१ कोटी ८० लाख ३२ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, २३ लाख २६ हजार रुपये किंमतीच्या मौल्यवान वस्तू – दागिने आणि ७ कोटी १२ लाख १७ हजार रुपये किंमतीचे मोफत वाटपाचे / इतर साहित्य ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमधून प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहे.