विशेष संपादकीय
खरा पक्ष कोणाचा ? लोकांना कोणता विचार पटला ? विकास कोण करणार ?
निवडणूक निकालाने मिळतील अनेक प्रश्नांची उत्तरे !
राज ठाकरेंचे राज्यातील नेमके स्थान काय ? वंचित बहुजन आघाडीला काही भवितव्य आहे की नाही ? मायावती भरमसाठ उमेदवार का उभे करतात ? अशाही प्रश्नांची उत्तरे निकालात सापडण्याची शक्यता आहे. या शिवाय, कोणाचा पक्ष खरा ? कोणाचा झेंडा योग्य ? याचाही निकाल याच निवडणुकीत लागणार आहे…!!
२८८ आमदारांच्या बरोबरच जनतेला काही पक्षही निवडायचे आहेत! शिवसेना खरी कोणाची ? याचाही निकाल मतदार घेणार आहेत.
२८८ जागंसाठी उभ्या असणाऱ्या चार हजारांहून अधिक उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमच्या बटणां आड आज बंद होणार आहे. नंतर आणखी ७२ तास उलटल्यावर निकाल लागायचा आहे. या पुढच्या तीन दिवसात राज्याचे पुढच्या पाच वर्षांतील सरकार कोण बनवणार हे ठरायचे आहे. खरंच फार मोठी गोष्ट होते आहे. राज्यातील नऊ कोटी मतदारांच्या खांद्यावर खरंच फार मोठी जबाबदारी आज येऊन पडलेली आहे. ही निवडणूक फक्त पंधराव्या विधानसभेच्या स्थापनेची आहे असे बिलकुल नाही! ही निवडणूक होते आहे ती, कोणता विचार महाराष्ट्रात प्रभावी आहे ? भाजपा प्रणित महायुतीचा विचार की काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचा विचार ? लव्ह जिहादच्या चालीवर व्होट जिहाद करण्याचे खुले आवाहन होत असताना, “बटेंगे तो कटेंगे”चा आणि “एक है तो सेफ है” चा प्रतिनारा दिला जातो आहे. यातील श्रेष्ठ कोण ? हेही ही निवडणूकच ठरवणार आहे. राज ठाकरेंचे राज्यातील नेमके स्थान काय ? वंचित बहुजन आघाडीला काही भवितव्य आहे की नाही ? मायावती भरमसाठ उमेदवार का उभे करतात ? अशाही प्रश्नांची उत्तरे निकालात सापडण्याची शक्यता आहे. या शिवाय, कोणाचा पक्ष खरा ? कोणाचा झेंडा योग्य ? याचाही निकाल याच निवडणुकीत लागणार आहे…!!
288 आमदारांच्या बरोबरच जनतेला काही पक्षही निवडायचे आहेत! शिवसेना खरी कोणाची ? याचाही निकाल मतदार घेणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेनेही याच शिवसेनेला पुरेसा कौल दिलेला आहे. ठाकरेंचे आठ खासदार निवडून आले पण ते लोकसभेच्या 21 जागा लढले होते. शिंदेंनी पंधरा जागा लढवल्या आणि सात खासदार दिल्लीत पाठवले, हे महत्वाचे ठरले आहे. स्ट्राईक रेटमध्ये ठाकरेंपेक्षा शिंदेंनी बाजी मारलेली दिसली आणि खासदार संख्येत दोघे बरोबरीत सुटले असे म्हणावे लागेल. पण तरीही बाळासाहेबांनी गाजवलेले धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह आणि मूळचे शिवसेना हे नाव हे दोन्ही एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने बहाल केले आहे ही बाब लक्षणीय ठरते.
आज होणाऱ्या मतदानात विधानसभेत कुणाचे संख्याबळ मोठे दिसणार, शिंदेंच्या शिवसेनेचे ? की सेना उबाठा या उद्धव ठाकेरंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेस बाबत होते आहे. शरद पवारांच्या नेतृत्वातील रा.काँ.ला निवडणूक आयोगाने नवे चिन्ह घ्यायला लावले. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह व रा.काँ.श.प. हे नाव घेऊन शरदराव उभे आहेत. तर अजितदादांना मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि मूळचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. पण लोकसभा निवडणुकीत जनतेची साथ अजितदादांना नाही, तर शरद पवारांना लाभली होती. अजित पवारांनी उभ्या केलेल्या चार खासदारकीच्या जागांपैकी फक्त एक जागा दादा निवडून आणू शकले. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाही पराभव पहावा लागला. आणि तोही दादांचा भरंवसा होता त्या बारामती मतदारसंघांमध्ये. तो पराभव दादांना जिव्हारी लागला होता.
आता विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी 59 जागी घड्याळ चिन्हावर लोक उभे केले आहेत. ते स्वतः पुन्हा एकदा बारामती मधून आमदार होऊ पाहात आहेत. पुन्हा एकदा त्यांना पवार विरुद्ध पवार, असा घरचाच सामना लढावा लागतो आहे. तिथे सख्या भावाचा मुलगा युगेंन्द्र हा काका अजितदादांच्या विरोधात शड्डू ठोकून उभा आहे. त्याच्या मागे सुप्रिया सुळे व शरद पवारांनी सारी ताकद उभी केलेली आहे. या मतदारसंघात नेमके कसे मतदान होते याकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
जसा राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यातील ऐतिहासिक पक्ष फुटीवरील जनतेचा कौल जसा या मतदानात लागणार आहे, तसाच कौल जरांगे पाटील यांचे आंदोलन पुढे कोणत्या दिशेने जाणार, याचाही निकाल याच निवडणुकीत लागायचा आहे. “कोणाला जिंकवायचे वा कोणाला हरवायचे याचा फैसला मराठा समाज घेणार…” अशा गर्जना जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी मधून केल्या होत्या. आधी ते निवडणुकीत उमेदवार उभे करणार होते. त्यासाठी त्यांनी सराटीमध्ये संभाव्य उमेदवारांना बोलावून घेतले. शे दोनशे संभाव्य उमेदवार हे तिथे रोजच जाऊन बसत होते. त्यांच्या मुलाखतीही जरांगेंनी घेतल्या. मग त्यांच्या बहुधा लक्षात आले की एकाला तिकीट द्यायचे तर त्या मतदारसंघातील अन्य दहा नेते दुरावणार आहेत! मग त्यांनी सर्वांनाच फॉर्म भरायला संगितले आणि “महणाले की अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आपण ठरवू. प्रत्येक मतदारसंघात एकचा मराठा नेत्याने अर्ज ठेवा, बाकीच्यांनी मागे घ्यावा, हे आपसात बसून ठरवा…” अशी त्यांची आदर्श संकल्पना होती. पण तसे निवडणुकीत होत नसते. कोणीच सहजासहजी अर्ज मागे घेणार नसते, याचे भान आले तेंव्हा जरांगेंनी पुन्हा भूमिका बदलली. मग ते म्हणाले की “कुणाला पाडायचे वा कुणाला निवडून आणायचे, याचा निर्णय़ समाजाने घ्यावा. आम्ही कोणालाच समर्थन देत नाही…”
तत्पूर्वी निवडणुकांच्या तयारीच्या काळात आधी महिनाभर आडबाजूच्या सराटी गावात त्यांच्याकडे राजु शेट्टी, संभाजीराजे, असे तिसऱ्या आघाडीचे नेते येत होते. काही भाजपा शिवेसनेचे नेतेही भेटून गेले. काँग्रेस व शरद पवारांच्या पक्षाचे लोक नेहमीच त्यांना भेटत होते.
आता मराठवाड्यातली सेहेचाळीस मतदारसंघात, तसेच बाहेर नासिक, नगर, पुणे, सोलापूर या भागात कुठे कुठे मराठा आंदोलक भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गेले महिना दोन महिने,जरांगेंचा सारा रोख, हा राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपाचे राज्यातील सर्वोच्च नेते, देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे होता. फडणवीसींना पराभूत करण्याची प्रतिज्ञाच जरांगेंनी घेतलेली दिसते. त्याचा कितपत परिणाम भाजपावर होणार हा मुद्दा आहे.
जरांगेंच्या विरोधात लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते उभे राहिले. जरांगेंच्या विरोधात हाकेंनी उपोषण आरंभले होते. छगन भुजबळ हे जरांगेंना उघड विरोध करतच होते. त्यांनाही पाडण्याच्या घोषणा जरांगेंनी दिल्या होत्या. राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा मतदानाचा सामना काही ठिकाणी रंगतो का हेही या निवडणुकीत ठरायचे आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजयरथ महाराष्राआुत शरद पवार-उद्धव ठाकरे-नाना पटोले यांच्या रा.काँ.श.प., सेना उबाठा आणि काँग्रेस अशा महाविकास आघाडीने अडवला होता. भाजपाच्या पदरात फक्त खासदारकीच्या नऊ जागा पडल्या. मविआच्या पारड्यात 30 जागा गेल्या आणि सांगलीची एक जागा अपक्ष आली. विशाल पाटील हे अपक्ष निवडून गेलेले सांगलीचे खासदार अधिकृतरीत्या काँग्रेसचे सहयोगी सदस्य बनले.
लोकसभेच्या त्या विजयाने काँग्रेस सह सारे मविआचे घटक पक्ष , आता आपली सत्ता आलीच, या धुंदीत वावरत होते. पण हरयाणाच्या निकालाने ते थोडे जमिनीवर आले. दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनीही महाराष्ट्राची निवडणूक गंभिर्यने घेतली आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गेंसह त्या पक्षाचे आजी माजी मुख्यमंत्री हे सातत्याने महाराष्राधीत फेऱ्या मारत आहेत. सभा घेत आहेत. त्यामुळे काँग्रेसची निवडणूक मोहीम जोरात झालेली आहे. उद्धव ठाकरेही फिरत आहेत. शरद पवारांच्या तर स्टमिनाला सारेच सलाम करत आहेत. या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाचा कस या निवडणुक निकालाने लागणार आहे.
भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा महाराष्ट्र जिंकण्याचा चंग बंधून प्रयत्नाची पराकाष्टा केली आहे. त्यांचेही राष्ट्रीय स्तरावरचे सारे नेते महाराष्ट्रात सभांचे रान उठवून गेले. गृहमंत्री अमित शहा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभाही भरपूर संख्याने झाल्या आहेत. देवेन्द्र फडणवीस हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगत आहेत की पुन्हा एकदा महायुतीच सत्ता येणार. एकनाथ शिंदे आणि अजितदाद पवारही त्याच सुरात सूर मिसळून सत्तेची ग्वाही देत आहेत विनोद तावडेंनी तर आकडाच जाहीर केला आहे की “आमच्या महायुतीचे 170 ते 175 आमदार विजयी झालेले दिसतील !” भाजपाने सलग तिसऱ्या निवडणुकीत शंभराहून अधिक आमदार संख्या गाठली तर तो एक विक्रमच ठरणार आहे आणि पुन्हा सत्ता राखली तर तोही आणखी मोठा विक्रम ठरणारर आहे.