नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमांचा प्रभावी वापर करून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती करण्यात आली आहे.
सुट्टीच्या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात कुटुंबियांसमवेत फिरायला बाहेर पडतात किंवा मॉलमध्ये खरेदीसाठी जातात हे लक्षात घेत वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्यांसोबतच मॉल्समध्ये फ्लॅश मॉब सारख्या आधुनिक नृत्य प्रकारचाही प्रभावीपणे उपयोग करण्यात आला.
यामध्ये सीवूड येथील नेक्सस मॉल तसेच वाशी येथील इनॉर्बिट मॉल याठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना आकर्षित करून घेणारी गाणी अचानक सुरू होऊन त्या तालावर मॉलच्या मध्यभागी युवक-युवतींचा समूह नृत्य सुरू करतो. मग आपसूकच त्यांच्याकडे सगळे लोक खेचले जातात आणि नृत्य पाहण्यासाठी भोवताली गर्दी जमू लागते. विविध लोकप्रिय गाण्यांच्या माध्यमातून 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन नृत्य समुहाव्दारे नागरिकांना करण्यात आले, त्याला नागरिकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला.
अशाच प्रकारे पथनाट्यासारख्या पारंपारिक प्रचार माध्यमांतूनही महापालिका क्षेत्रात बस डेपो, रेल्वे स्टेशन, मार्केट, वाणिज्य क्षेत्रे, मोठे चौक, नाके अशा वर्दळीच्या ठिकाणी सर्व आठही विभागांमध्ये मागील आठवडाभरात 60 हून अधिक ठिकाणी मतदान जनजागृतीपर पथनाट्ये करण्यात आली. त्यालाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
याशिवाय मतदान यंत्राचे मॅस्कॉट (शुभंकर) तयार करण्यात आले होते. या मतदान यंत्ररूपी 2 मॅस्कॉटनेही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी फिरून मतदान करा असा संदेश प्रसारित केला. या मॅस्कॉटसोबत अनेकांनी हौसेने सेल्फी छायाचित्रे काढली.
मतदानाचा संदेश जनमानसात प्रसारित करण्यासाठी सायकलवर मतदानाचे आवाहन करणारे फलक लावून त्या सायकलीही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत छोट्या रस्त्यांवर फिरविण्यात आल्या व गल्लोगल्लीतील मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा विविध माध्यमांतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कलात्मक रितीने विधानसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायं. 6 या वेळेत मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *