मुंबई : मेघना साने यांना ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चा विशेष पुरस्कार त्यांच्या ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकासाठी घोषित झाला आहे. मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वार्षिक सोहळ्यात हा पुरस्कार त्यांनी सुप्रसिद्ध लेखक डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक व अध्यक्षा नमिता कीर उपस्थित होत्या.
परदेशात स्थापन झालेल्या मराठी शाळा, त्यांच्या अभ्यासक्रमाची निर्मिती, तिथे शिकवले जाणारे विषय, मराठी शिक्षणाचे तेथे असलेले महत्त्व याचा अभ्यास करून मेघना साने यांनी ‘मराठी सातासमुद्रापार’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला अनुराधा नेरूरकर यांनी प्रस्तावना लिहीली आहे. सतीश भवसार यांनी मुखपृष्ठ केले आहे. ग्रंथाली प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मेघना साने यांना यापूर्वी २०२१ मधे त्यांनी संपादित केलेल्या ‘पुस्तकांवर बोलू काही’ या पुस्तकासाठी कोमसापचा ‘वि. कृ. नेरुरकर स्मृती’ पुरस्कार मिळाला होता व २०१६ मधे कोमसापचा ‘कै. राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ती’ हा पुरस्कार मिळाला होता.
मेघना साने लिखित ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकाला ‘मुक्त सृजन साहित्य पत्रिके’चा संकीर्ण विभागातील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, ‘शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन’ चा ‘तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’ व ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चा विशेष पुरस्कार असे तीन राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ या एकाच वर्षी मिळाले आहेत.
०००