विनोद तावडे यांच्यावर हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल
वसई: मंगळवारच्या नोटा वाटप नाट्य प्रकरणानंतर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘काल विनोद तावडे भिजलेल्या कोंबडीप्रमाणे बसले होते आणि मुंबईला गेल्यावर त्यांना कंठफूटला असे ठाकूर म्हणाले. मतदारसंघात कोणी दिसलं तर त्यांना पुन्हा फटकवणार असा इशारा त्यांनी ‘दिखेंगे तो पिटिंगे’ अशा शब्दात दिला.
मंगळवारी संध्याकाळी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये नोटा वाटप नाट्य घडले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले होते. तब्बल साडेचार तास त्यांनी भाजप नेत्यांची कोंडी केली होती. या प्रकरणात भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह भाजपच्या ३६ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पैशांचे वाटप करून मतदारांना लाज दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विनोद तावडे यांनी मात्र आता बविआवर आरोप केले आहेत. हॉटेलमध्ये सापडलेले पैसे भाजपचे नव्हते तसेच हॉटेल ठाकुरांच्या मालकीचे होते असाही आरोप तावडे यांनी केला आहे.
बुधवारी हितेंद्र ठाकूर यांनी तावडे यांचा आरोपाचा खरपूस समाचार घेतला. या प्रकरणामुळे भाजपाला फायदा होईल असे भाजप नेते सांगत आहेत. याचा अर्थ हॉटेलमध्ये सापडलेले पैसे भाजपने मतदारांपर्यंत वाटले असा होतो. पैसे तुमचे, वाटले तुम्ही आणि फायदा देखील तुम्हाला होईल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. विवांता हॉटेल हितेंद्र ठाकूर यांच्या मालकीचे होते असा आरोप विनोद तावडे यांनी केला आहे. त्याला ठाकूर यांनी जोरदार उत्तर दिले. जर हॉटेल माझ्या मालकीचे होते तर भाजपने का बुक केले? विनोद तावडे यांनी ते हॉटेल माझ्या नावावर करून द्यावे असेही ते म्हणाले. विनोद विनोद तावडे काल विरार मध्ये असताना भिजलेला कोंबडीप्रमाणे बसले होते. मला सारखे फोन करता होते. आता मुंबईत गेल्यावर त्यांना कंठ फुटला असून ते आरोप करत आहेत. खोटं बोला पण रेटून बोला ही भाजपाची प्रवृत्ती आहे असे ते म्हणाले.
‘आज दिखेंगे तो पिटेंगे’
आज सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. मतदारसंघामध्ये बाहेरची लोकं आल्याने हा वाद निर्माण झाला होता. आज जर पुन्हा कोणी बाहेरून आलेले दिसले तर त्याला पुन्हा फटकावणार असा इशाराही ठाकूर यांनी ‘दिखेंगे तो पिटेंगे’ या धर्तीवर दिला.
00000
