ठाणे : विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यावर लावण्यात येणारी ओळख शाई पाण्याने धुतली असता, पुसट होत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून करण्यात आल्या. ठाणे जिल्हा विधानसभा मतदारसंघातील कोपरी पाचपाखाडी, ठाणे शहर, अंबरनाथ, नवी मुंबई आणि मुरबाड मतदारसंघातील अनेक मतदारांच्या बोटावरील शाई पुसट झाल्याची बाब मतदारांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितली.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधुम बुधवारी सर्वत्र पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीच्यावेळी मतदार याद्यांमधून मतदारांची नावे गायब होणे, मतदानकेंद्र बदलणे, तसेच काही तांत्रिक अडचणी, अशा अनेक समस्यांना मतदारांना सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीतही असाच काहीसा प्रकार झाला. अशातच मतदान केल्यावर ओळख म्हणुन लावण्यात येणारी बोटावरील शाई पाणी लागल्यास पुसट होत असल्याची बाब मतदार प्रदीप गुजर यांनी लोकसत्ताला सांगितली. गुजर हे सकाळी त्यांच्या मतदरसंघातील मतदान केंद्रावर मतदान करण्यास गेले होते. मतदान करून घरी आल्यावर त्यांनी आपले हात पाण्याने धुतले. बोटावरील शाईला पाणी लागल्याने ती पुसट होत असल्याचे त्यांना आढळले. शाई पुसली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी ही बाब लोकसत्ता प्रतिनिधींना सांगितली. या प्रकाराबाबत इतर मतदारसंघात पाहणी केली असता, असाच प्रकार ठाणे शहर मतदारसंघाबरोबरच कोपरी पाचपाखाडी, अंबनाथ, मुरबाड, नवी मुंबई मतदारसंघातील मतदारांना असाच अनुभव आल्याचे चित्र होते. याप्रकरणी मतदारांना विचारणा केली असता नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी ही बाब सांगितली.तर याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

मतदान केल्यावर अनेक आठवडे बोटावरील शाई असते. विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यावर लावण्यात आलेली शाई काही वेळातच पुसट झाली.- सरिता मांडावकर, मतदार

बोटावर लावण्यात येणार शाई ही पक्की असते. अशा प्रकारे शाई जाणे शक्य नाही. आम्ही जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता मतदारांच्या बोटांवरील शाई पुसट होणे अथवा निघून जाणे असे कोणतेही प्रकार आढळून आलेले नाही.- उर्मिला पाटील, उपविभागीय अधिकारी, ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *