सौर ऊर्जा वितरणाचे कंत्राट मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना २ हजार कोटी रूपयांची लाच दिल्याचा आरोप

न्युयॉर्क : भारताच्या उद्योगजगतात भुकंप झाला आहे. भारतातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणींच्याविरोधात भ्रष्ट्राचार प्रकरणात अमेरिकेत अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. सौर ऊर्जा वितरणाचे कंत्राट मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना २ हजार कोटी रूपयांची लाच दिल्याचा आरोप गौतम अदाणींवर ठेवण्यात आला आहे. हा भ्रष्ट्राचार करून गुंतवणूकदार अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याचा ठपकाही गौतम अदाणींवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान गौतम अदाणी हे मोदींचे मित्र असल्यानेच केंद्र सरकार त्यांचा बचाव करीत असल्याच आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या अटक वॉरंटमुळे गौतम अदाणी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

न्यूयॉर्कच्या न्याय विभागाच्या उप सहाय्याक अॅटर्नी जनरल लिसा एच मिलर यांनी गौतम अदाणी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे. गौतम अदाणी यांच्याबाबतची ही बातमी सकाळी जेव्हा आली तेव्हा त्याचा परिणाम अदाणी समूहाच्या शेअर्सवर झाला. अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये १० ते २० टक्क्यांची घसरण दिसून आली तर अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्सही घसरले आहेत. अदाणी पोर्ट आणि सेझ, अदाणी पॉवर आणि एनर्जी ग्रीनचे शेअर्सही घसरले.

यासंदर्भात अदाणींवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. खुद्द गौतम अदाणी व त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह एकूण सात जणांचा यात समावेश आहे. या सगळ्यांनी मिळून सौर ऊर्जा वितरणाचं कंत्राट मिळवण्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना २ हजार ०१९ कोटी रूपयांची लाच देऊ केली. अदाणी व अदाणी ग्रीन एनर्जीमधील कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांनी हा सगळा प्रकार कर्जदार व गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवला व त्यातून ३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक कर्ज व रोखे गोळा केले, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

अदाणींकड़ूंन आरोपांचा इन्कार

अदाणी समूहाकडून जारी केलेल्या निवेदनात भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलं आहे. “अमेरिकेच्या विधी विभागाकडून ‘अदाणी ग्रीन्स’च्या संचालकांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून आम्ही ते सर्व आरोप फेटाळत आहोत”, असं या निवेदनात सुरुवातीलाच नमूद करण्यात आलं आहे. “अमेरिकेच्या विधी विभागानंच नमूद केल्याप्रमाणे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे तोपर्यंत फक्त आरोप ठरतात, जोपर्यंत ते सिद्ध होत नाहीत. तोपर्यंत संबंधित आरोपी हा निर्दोषच असतो. या प्रकरणात आम्ही शक्य त्या सर्व कायदेशीर बाबींची विचार करत आहोत”, असंही या निवेदनात अदाणी समूहाकडून सांगण्यात आलं आहे.

भाजपाचा पलटवार

“अदानी समूहाविरुद्ध अमेरिकेच्या आरोपांमध्ये नमूद केलेल्या चार राज्यांपैकी एकाही राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री नव्हता. छत्तीसगड आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेत होते”, असं संबित पात्रा म्हणाले. ओडिशा (तेव्हा नवीन पटनायक यांच्या बीजेडीचे सरकार), तामिळनाडू (डीएमके अंतर्गत), छत्तीसगढ (काँग्रेस), आणि जम्मू आणि काश्मीर (केंद्रीय शासनाखाली) या राज्यांची नावे अमेरिकेच्या आरोपात आहेत. तेव्हा आंध्र प्रदेशचे नेतृत्व जगन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसकडे होते. राहुल गांधींवर ताशेरे ओढत पात्रा म्हणाले की, भारतावर आणि देशाचे रक्षण करणाऱ्या संरचनेवर हल्ला करणे ही विरोधी पक्षांची नेहमीची खेळी आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस खासदार आणि सोनिया गांधी हे दोघेही जामिनावर बाहेर आहेत याकडेही पात्रा यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

अदाणींना अटक करण्याची पंतप्रधान मोदीत हिंमत नाही

 “भाजपाला मिळणारा सगळा निधी हा अदाणींकडून येतो. भाजपाचे आर्थिक व्यवहार त्यांच्याच हातात आहेत. पंतप्रधानांनी ठरवलं तरी ते अदाणींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकत नाहीत. अदाणी यांनी देश बळकावला आहे. देश त्यांच्या मुठीत आहे. देशातील विमानतळं, बंदरं, संरक्षण यंत्रणा अदाणींच्या ताब्यात आहे. सगळीकडे अदाणींची केंद्र सरकारबरोबर भागिदारी आहे. एका बाजूने अदाणी आणि दुसऱ्या बाजूने नरेंद्र मोदी मिळून आपला देश लुटत आहेत. मोदी व भाजपा त्यांच्या पापात सहभागी आहेत. त्यामुळे मोदी त्यांना अटक करणार नाहीत. मुळात मोदींमध्ये तेवढी हिंमत व क्षमता नाही. कारण ज्या दिवशी मोदी व आपलं सरकार गौतम अदाणी यांना अटक करेल. त्या दिवशी मोदी देखील तुरुंगात जाऊ शकतात”.

सात आरोपी

अमेरिकेत दाखल गुन्ह्यात सात जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. यामध्ये गौतम अदानी, सागर एस अदानी, विनीत एस. जैन, रणजीत गुप्ता, सिरिल काबेनेस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा, रुपेश अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *