वाशी : कांद्याच्या भावाने किरकोळ बाजारात शंभरी गाठली आहे. ग्राहकांसाठी कांद्याची वाढलेली किमत चिंता वाढवणारी ठरली आहे. सध्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत कांदा पोहोचल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
कांद्याच्या किमतीत झालेली वाढ ही मागील काही आठवड्यांपासून होत असलेल्या कमी पुरवठ्यामुळे झाली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. वाशीतील एपीएमसीत येणारा कांदा नवीन असून काहीसा ओलसर आहे. जुना कांदा सुकलेला असल्याने ग्राहकांकडून जुन्या कांद्याला मोठी मागणी असते; परंतु सध्या सुकवलेल्या कांद्याचा एपीएमसी बाजारात तुटवडा जाणवत असल्याने कांद्याचे भाव वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. गुरुवारी एपीएमसीच्या कांदा बटाटा बाजारात एकूण १५७ गाड्यांमधून २५,४२० गोणी कांद्याची आवक झाली. या वेळी जुन्या कांद्याचे भाव ४५ ते ६५ रुपये किलो इतके होते; तर नवीन कांदा ३० ते ५५ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे, मात्र हे भाव घाऊक बाजारातील असून याचा मोठा परिणाम किरकोळ बाजारावर झाला आहे. नवी मुंबईच्या किरकोळ बाजारात काही ठिकाणी कांदा ८० ते ८५ रुपये किलो; तर काही ठिकाणी १०० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. हीच परिस्थिती मुंबई आणि ठाणे परिसरातदेखील आहे. यामुळे ग्राहकांना चांगलाच फटका बसला आहे. कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे नागरिकांनी आपल्या दैनंदिन आहारातून कांद्याचा वापर कमी केला आहे. वाढलेल्या किमतीचा परिणाम घराच्या बजेटवरदेखील झाला असल्याचे अनेकांनी सांगितले.
गुरुवारची एपीएमसीतील आवक
गाड्या – १५७
गोण्या – २५,४२०
पुढील काही दिवसांत कांद्याच्या भावात आणखी वाढ होऊ शकते. सध्या बाजारात सुकलेला कांदा येण्यास विलंब लागत असल्याने कमी प्रतीचा कांदा जास्त भावाने विकावा लागत आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचा कांदा बाजारात येईपर्यंत हे भाव चढेच राहतील.
– मनोहर तोतलानी,
कांदा-बटाटा व्यापारी, एपीएमसी
