अवकाशातील आपल्या भ्रमणकक्षेत लाकूड कसे राहते याचा अभ्यास करण्यासाठी जपानच्या संशोधकांनी एक लाकडी उपग्रह तयार केला असून तो दिनांक ५ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या क्षेपणास्त्रामधून अवकाशात पाठवला गेला आहे. हा लाकडी उपग्रह आकाराने लहान असला तरी त्याचे महत्व यासाठी आहे की माणूस लाकडाची लागवड करू शकतो आणि आवश्यक तेथे लाकडाची घरे देखील बांधू शकतो. आज जगात अशी घरे बांधली जात आहेत.
या उपग्रहाला ‘लिग्नोसॅट’ असे नाव दिले गेले असून त्यातील ‘लिग्नो’ हा शब्द लॅटिन भाषेतील असून त्याचा अर्थ लाकूड असा होतो. या उपग्रहात कोणतेही स्क्रू अथवा जोडण्याचे पदार्थ उपयोगात आणले गेलेले नाहीत असे सांगितले जाते. या उपग्रहात असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे अवकाशाच्या तीव्र परिस्थितीत लाकूड कसे राहते याचा शोध घेतील आणि हा शोध सहा महिने चालणार आहे. या प्रयोगाचे निष्कर्ष जर सकारात्मक असतील तर अवकाशात वस्ती करून राहण्याच्या दृष्टीने लाकडी घरे बांधता येतील का हे पाहिले जाईल.
या संशोधनाचे प्रमुख ताकाओ दोई म्हणाले की अशाच प्रकारचे उपग्रह चंद्र आणि मंगळ ग्रहांचा अभ्यास करण्यासाठीही पाठवले जातील. जपानमधील क्योतो विद्यापीठाच्या संशोधकांची ही कामगिरी आहे. हा उपग्रह पृथ्वीपासून ४०० किलोमीटर्स अथवा २५० मैल उंचीवरील भ्रमणकक्षेत सोडला जाईल. महाताव्ची बाब म्हणजे या उपग्रहाचा आकार केवळ आपल्या तळहाताएवढा आहे. संशोधनाचे प्रमुख ताकाओ दोई हे स्वत: जपानी अवकाशयात्री असून ते सध्या अवकाशातील मानवी कार्याचा अभ्यास करीत आहेत.
लाकूड हे अवकाशातही टिकून राहील हे सिद्ध करण्यासाठी दोई यांचे प्रयत्न सुरु आहेत. क्योतो विद्यापीठाच्या जंगल संशोधन विभागाचे प्राध्यापक कोजी मुराटा म्हणाले की १९ व्या शतकाच्या सुरुवातीला विमान देखील लाकडाची बनवली गेली आहेत. त्यामुळे लाकडी उपग्रह देखील एक सुयोग्य पाउल असणार आहे. शिवाय अवकाशामध्ये पृथ्वीसारखे पाणी तसेच प्राणवायू नसल्यामुळे लाकूड सडणार अथवा जळणार नाही. त्याशिवाय लाकडी उपग्रहामुळे होणारा विपरीत पर्यावरणीय परिणाम अतिशय कमी असेल.
आपले काम संपल्यानंतर प्रत्येक उपग्रहाला पृथ्वीच्या वातावरणात परत यायचे असते. अशावेळी आजच्या धातूनी बनलेल्या उपग्रहांमधून परतीच्या मार्गावर घातक पदार्थ पृथ्वीवर फेकले जातात. हा लाकडी उपग्रह जर कार्यक्षम ठरला तर येत्या काला धातूंचे बनलेले उपग्रह बाद होतील असेही संशोधन प्रमुख ताकाओ दोई म्हणाले
जपानमध्ये उपलब्ध असलेल्या ‘होनोकी’ या वृक्षाचे लाकूड तलवारींचे म्यान तयार करण्यासाठी वापरले जात असे. हेच लाकूड अवकाशयानासाठीही सर्वात अधिक योग्य असल्याचे आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रामधील १० महिन्यांच्या प्रयोगात सिद्ध झाले आहे. हा उपग्रह त्यात असलेल्या इलेक्ट्रॉनिक घटकांवर अवकाशातील वातावरणाचा काय परिणाम होती त्याचाही अभ्यास करणार आहे. आज बाजूला पडलेल्या लाकूड आणि त्या निमिताने जंगलतोड थांबवू या अशा मोहिमांना यशस्वी करता आले तर वृक्षलागवड माणसाला उपयोगाची आहे हे देखील सिद्ध होईल. उद्याच्या तंत्रज्ञानाची गुरुकिल्ली म्हणून लाकडाकडे पाहिले गेले पाहिजे ते यासाठीच…
प्रसन्न फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *