जव्हार : जव्हार तालुका हा ग्रामीण आणि दुर्गम भाग आहे. येथे आरोग्य सेवा हा मुद्दा नेहमीच ऐरणीवर असतो. जव्हार शहरातील १०० खाटांचे पतंग शाह उपजिल्हा रुग्णालयावर मोखाडा, विक्रमगड, वाडा हे तालुके; तसेच डहाणू तालुक्यातील काही भाग अवलंबून आहे. शिवाय, याच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड यांची वर्णी पालघर येथील जिल्हा शल्यचिकित्सक पदी लागल्याने येथे पूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षकसह २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर रुग्ण सेवा देताना अतिरिक्त कामाचा ताण येऊन आरोग्य सेवेवरही परिणाम होत आहे.

पतंग शहा उपजिल्हा रुग्णालयाचे कामकाज चालवताना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच या रुग्णालयात प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, सर्जन, फिजीशियन, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, सोनोग्राफी तज्ज्ञ; तसेच भूलतज्ज्ञ आणि दंतरोग तज्ज्ञ ही पदे रिक्त असल्याने रुग्ण सेवा देताना मर्यादा येत आहेत. परिणामी, रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक, सेलवास, ठाणे येथे पाठवले जाते. या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यांना सेवा देण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी असणे गरजेचे असताना वर्षाहून अधिक काळापासून पुरेसे कर्मचारी उपलब्ध होऊ शकलेले नाही. सध्या उपजिल्हा रुग्णालयाकडे १०७ मंजूर पदांपैकी २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच अतिरिक्त कामाचा ताण येत आहे.  त्याचा रुणसेवेवरही परिणाम होऊ लागला आहे.

दर महिन्याला अहवाल

अलीकडच्या काही वर्षांत आरोग्य विभागाने उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्षच केले आहे. त्याचा मोठा फटका रुग्ण सेवेला बसत आहे. डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अहवाल दर महिन्याला उपजिल्हा रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवला जातो. मध्यंतरी काही पदे भरली आहेत. गेल्या काही वर्षांत रिक्त पदे पूर्णपणे भरलेलीच नाहीत. त्याचबरोबर वयोमानानुसार कर्मचारीही सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन पदे तातडीने भरली जात नाहीत. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेची घडी विस्कटण्याच्या मार्गावर आली आहे.

अनेक वर्षे पदे रिक्तच

सरकारकडून आरोग्य सेवेतील पदांची भरती केली जात नाही. मध्यंतरी भरती प्रक्रिया पार पडली; मात्र त्यात पुरेसी पदे भरली नाहीत. अनेक वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहणच लागले आहे. उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने यापूर्वी कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर व काही कर्मचारी सेवेसाठी घेतले होते. मात्र, तरी अतिरिक्त कामाचा ताण त्यांच्यावर पडत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याचा विचार करून पदे भरती करणे गरजेचे आहे.

कोट

जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १०७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २७ पदे रिक्त आहेत. या पदांचा अहवाल दर महिन्याला वरिष्ठ कार्यालयाला पाठवला जातो. मंजूर असलेली पूर्ण पदे भरलेली नाहीत. उपलब्ध कर्मचारी आणि काही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू आहे.

– डॉ. भरतकुमार महाले,

प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय जव्हार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *