मुंबई : राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी परीक्षेच्या लेखी व प्रात्यक्ष‍िक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीच्या लेखी परीक्षा ११ फेब्रुवारीपासून १८ मार्चपर्यंत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षांच्या तारखा लवकर जाहीर झाल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

बारावीच्या सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन लेखी परीक्षा अकरा फेब्रुवारीपासून सुरू होईल. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २४ जानेवारीपासून १० फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. तर, दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षेची सुरुवात ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभागीय वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

तारखांचे तपशील

बारावी    लेखी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा

११ फेब्रुवारी ते १८ मार्च २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी

दहावी    २१ फेब्रुवारी ते १७ मार्च ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी

कोट

शाळा-महाविद्यालयांमध्ये परीक्षेचे वेळापत्रक छापील स्वरूपात देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या समाजमाध्यमांवरील माहितीवर विद्यार्थी तसेच पालकांनी विश्वास ठेवू नये.

– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *