ठाणे : एकनाथ शिंदेंचे काय होणार, देवेंद्र फडणवीसांचे काय होणार याच्याशी मला काही घेणे देणे नाही. आमचा मुख्यमंत्री होतोय हे म्हटल्यावर आम्ही कशाला त्यांचे बघायला जाऊ असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चक्क शिंदेंची स्तुती केली आहे. परिवर्तन होणार महाविकास आघाडी सत्तेत येणार असेही ते म्हणाले आहेत.
मतांची वाढलेली टक्केवारी ही नेहमीच सत्तेच्या विरोधात असते. सत्तेवर राग असतो म्हणून लोक बाहेर पडून भरभरून मतदान करतात. तुमची लाडकी बहीण योजना चांगली आहे, वाढलेले भाव आणि महागाई हे देखील बहिणींच्या लक्षात आलेले आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात की लाडकी बहीण माझीच योजना त्यात बिघाड झाला. म्हणजे प्रत्येकाने पाचशे पाचशे रुपये वाटून घेतले. आता पैसे वाढवून देणार कारण त्यांच्या बहिणी वाढल्या होत्या. बहिणींवरून आता त्यांच्यात स्पर्धा लागली आहे, असा टोला आव्हाड यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला.
आतापर्यंत निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात व्हायच्या आणि दिवस निघून जायचे. आता पैसे वाटप, पोलिसांवर प्रचंड दबाव आणणे हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय थोडीच झाले असेल असा सवाल करत शिंदेंनी युतीधर्म पाळला त्यांचे अभिनंदन करतो, असे आव्हाड म्हणाले. शिंदेंनी अजित पवारांच्या उमेदवाराला जोरदार समर्थन दिले. भले त्यांनी मला मदत नाही केली. त्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला तरी आपला मुख्यमंत्री आपल्या बाजूलाच राहतो हे बरे वाटते. त्यांना महायुतीतून काढून टाकले तर मला वाईट वाटेल असे आव्हाड म्हणाले.
बाकीचे वैर सोडून द्या, मुख्यमंत्री माझ्या घराच्या बाजूला राहतो ही सन्मानाची आणि मानाची बाजू आहे, असे संजय शिरसाट यांनी केलेल्या शिंदे शरद पवारांसोबत जाऊ शकतात या दाव्यावर आव्हाड म्हणाले. संजय शिरसाट हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना माझ्यापेक्षा पत्रकारांना हिंट देण्याबाबत जास्त समजते, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. तसेच भाजपा उघडपणे म्हणत असेल की मुख्यमंत्री होऊच देणार नाही याचा अर्थ भाजपचा कुठेतरी प्लान झालेला आहे, असा संशयही आव्हाड यांनी व्यक्त केला.