अनिल ठाणेकर
ठाणे : मुस्लीम दाम्पत्यास मतदान करण्यास माजी नगरसेविका अनिता गौरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केला विरोध केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
खारीगांवमधील गणेश विद्यालयात एका मुस्लीम दाम्पत्याचे मतदान आले होते. ते राहणारे मुंब्रा येथील आहेत. मात्र, निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे त्यांचे मतदान खारीगांवातील गणेश विद्यालयात आले होते. हे दोघेही पती पत्नी आपला मूलभूत अधिकार बजावण्यासाठी तिथे आले होते. परंतु, या दोघांनाही मतदान करण्यास माजी नगरसेविका अनिता गौरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी विरोध केला. त्यांनी मतदानच करायचे नाही, अशी भूमिका या शिवसैनिकांनी घेतली. माजी नगरसेविका अनिता गौरी तर इथपर्यंत पोहचल्या की, तुम्ही मुसलमान आहात; तुम्ही आमच्या इथे मतदानच करू शकत नाहीत. ते दाम्पत्य फक्त रडायचेच बाकी होते. तेवढ्यात मी तिथे पोहचलो. तोपर्यंत अनिता गौरी निघून गेल्या होत्या. मी तिथे जाऊन त्या निवडणूक अधिकाऱ्याची बिनपाण्याने चंपी केली तेव्हा त्याने या दोघांनाही मतदान करू दिले. मतदान हे लोकशाहीतील सर्वात मोठा अधिकार आणि सर्वात मोठे शस्त्र असून ते संविधानाने दिले आहे. अनिता गौरीसारखी शिकलेली नगरसेविका ही बूथमध्ये उभी राहून बोलते की, “तुम्ही मुसलमान आहात; तुम्ही मतदान करू शकणार नाहीत. माझ्या इथे तर करताच येणार नाही.” बोला, अजितदादा पवार हीच असते का धर्मनिरपेक्षता ? असा प्रश्न डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.
