भाईंदर : मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात तीन टक्के मतदान वाढले आहे. त्याचप्रमाणे मतदारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. आता या वाढीव मतदारांनी कौल नेमका कोणाला दिला आहे, हे येत्या शनिवारी मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत मिरा भाईंदर मतदरसंघात ४९.४ टक्के एवढे मतदान झाले होते. यावेळी त्यात वाढ होऊन ते सुमारे ५२ टक्के झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळचे मतदान सुमारे तीन टक्क्यांनी वाढले आहे. दुसरीकडे यावेळच्या निवडणुकीसाठी मतदारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या निवडणुकीत येथील मतदारांची संख्या चार लाख २८ हजार ३५८ एवढी होती, तर या वेळी मतदारसंख्या पाच लाख १० हजार ८६२ एवढी झाली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी मतदारांच्या संख्येत तब्बल ७२ हजारांनी वाढ झाली आहे.
२०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन लाख नऊ हजार १३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या वेळी मात्र अंदाजे दोन लाख ६५ मतदारांनी मतदान केले आहे. हे मतदान गेल्या विधानसभा निवडणुकीच्या व पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे ५६ हजारांनी अधिक झाले आहे. आता या वाढीव मतदानाचा सर्वाधिक लाभ कोणाला होणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याचा उलगडा आता २३ तारखेला मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे.
मागील निवडणुकीत विद्यमान अपक्ष आमदार गीता जैन यांना ७९ हजार ५७५, भाजपचे नरेंद्र मेहता यांना ६४ हजार ४९ व काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांना ५५ हजार ९३९ मते पडली होती. यावेळच्या विधानसभा निडणुकीतले राजकीय चित्र गेल्या निवडणुकीपेक्षा बदललेले होते. या वेळी नरेंद्र मेहता यांच्यासाठी पक्ष, तसेच संघ परिवार काम करत होता, तर मुझफ्फर हुसेन यांना ठाकरे गटाची साथ मिळाली.
मतांची विभागणी मविआच्या पथ्यावर
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात ४० हजार मतांची आघाडी घेतली होती; मात्र त्या वेळी महायुती विरुद्ध मविआ अशी थेट लढत होती. आता मात्र अपक्ष उमेदवार आमदार गीता जैन या महायुतीच्या मतांची विभागणी करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेली ४० हजारांची आघाडी विधानसभा निवणुकीत पुरेशी ठरणारी नाही. या पार्श्वभूमीवर यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानात सुमारे ५६ हजारांनी झालेली वाढ कोणाला फायदेशीर ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यातील मते जास्तीत जास्त महायुतीच्या बाजूने गेली, तर मेहता यांचा विजय सोपा होणार आहे; मात्र गीता जैन यांनी महायुतीच्या मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी केली, तर मविआच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरणार आहे.
