वाशी : मागील काही दिवसांपासून हवामानात होणाऱ्या बदलामुळे शहरात ताप व सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे. दुपारी कडक ऊन; तर रात्री हवेतील गारवा, पुन्हा पहाटेच्या सुमारास थंडी असे वातावरण अनेकांच्या प्रकृतीवर परिणामकारक ठरू लागले आहे. त्यामुळे खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांत रांगा वाढल्या आहेत.
सध्या शहरात हवा प्रदूषणदेखील वाढले आहे. त्यामुळे शहरात मध्यवर्ती असलेल्या वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयातही वाढ झाली आहे. याशिवाय खासगी रुग्णालयातदेखील रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांत वातावरणात सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे लहान मुले, तसेच ज्येष्ठ नागरिक आजारी पडण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्याही नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांनाही या समस्यांचा सामना करावा लागत आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी हवेत बदल होत असल्याने अचानक थंडीही जाणवत आहे. दिवसा पडणाऱ्या कडक उन्हामुळे कामानिमित्ताने घराबाहेर निघणाऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत, मात्र रात्रीच्या वेळी बोचरी थंडी जाणवत असल्यामुळे नागरिकांना एकाच दिवसामध्ये दोन ऋतू अनुभवायला मिळत आहेत. त्याचा परिणाम प्रकृतीवर होत असल्यामुळे अनेक जण सर्दी, तापाने ग्रासले आहेत. त्यापैकी अनेकांना घशाचा त्रास जाणवत आहे. अशातच शहरातल्या अनेक विभागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये खाडीलगतच्या भागांचा अधिक समावेश आहे.
डासांचा प्रादुर्भाव
खारफुटीमध्ये वाढलेले डास संध्याकाळच्या वेळी लोकवस्तीमध्ये घुसत असल्यामुळे डेंगी, मलेरियाची साथ पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे रुग्णालयांत रांगा दिसत आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून वेळेवर धुरीकरण होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषत्वाने उद्यानालगतच्या रहिवासी भागात संध्याकाळच्या वेळी डासांचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे अशा ठिकाणच्या रहिवाशांकडून धुरीकरणाची मागणी होत आहे.
सध्या ऋतूमानानुसार वातावरणात बदल घडत असतात. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांनी सूर्य उगवल्यावर जावे व स्वत:ची काळजी घ्यावी, ज्यामुळे त्रास कमी होईल. सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्येदेखील वाढ झाली आहे. वातावरण स्थिर झाल्यावर हा त्रास कमी होऊ शकेल.
– डॉ. प्रतिक तांबे,
जनरल फिजिशिअन
