– घरकाम करणाऱ्या महिलेला अटक

मुंबई : चोरीच्या दागिने घातलेले छायाचित्र समाज माध्यमांवर अपलोड केल्यामुळे चोरीची उकल करण्यात खार पोलिसांना यश आले आहे. आरोपी महिलेने खार परिसरातील एका व्यावसायिक महिलेच्या घरात सुमारे ३४ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली होती. याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिमा नागेंद्र निशादला (२०) खार पोलिसांनी अटक केली.

पांचाली ठाकूर (५७) या भावासोबत खार परिसरात राहातात. त्यांच्या घरापासून काही अंतरावर तिचे वयोवृद्ध आई-वडिल राहत असून त्यांच्याकडे पाच नोकर आहेत. तिच्या आईच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी महिमा निशाद हिला ठेवले होते. महिमा ही मुळची उत्तर प्रदेशमधील गोरखपूरची रहिवाशी असून सध्या ती सांताक्रुज येथील वाकोला, आनंदनगर परिसरात राहत होती. एप्रिल २०२३ पासून ती त्यांच्याकडे कामाला होती. तिच्या आईच्या खोलीत एक लॉकर असून तो उघडण्यासाठी पासवर्डचा वापर करावा लागतो. गरजेच्या वेळी पासवर्ड आठवत नसल्याने तिला एक चावी देण्यात आली होती. या लॉकरमध्ये तिने तिचे सर्व सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ठेवली होते. या चावीसह पासवर्डची महिमाला माहिती होती.

लक्ष्मीपूजनच्या दिवशी १ नोव्हेंबर रोजी पांचाली आईकडे दागिने घेण्यासाठी गेली होती. मात्र तिला लॉकर उघडता आला नाही. तिला लॉकरची चावीही सापडली नाही. अखेर तिने दुसऱ्या चावीने लॉकर उघडले असता तेथील ३४ लाख २३ हजार रुपयांचे विविध सोन्याचे, चांदीचे दागिने आणि पाच हजार रुपयांची रोख असा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले.

महिमाने ८ नोव्हेंबर रोजी व्हॉटस् ॲपवर अपलोड केलेले एक छायाचित्र पांचालीच्या निदर्शनास आले. त्यात महिमाच्या गळ्यातील सोनसाखळी आणि उजव्या हातातील अंगठी पांचालीच्या आईची असल्याचे दिसले. तिच्या घरी महिमानेच चोरी केल्याची खात्री पटताच ८ नोव्हेंबर रोजी पांचालीने खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीनंतर महिमाविरोधात पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी महिमाला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *