आरोपी मुलासहित वडिलांवर गुन्हा दाखल
सुनिल इंगळे
उल्हासनगर : एका अल्पवयीन मुलाने भरघाव वेगाने स्कूटर चालवून वृद्ध इसमाला धडक दिल्याने सदर वृद्ध गंभीरित्या जखमी झाला आहे. यासंदर्भात उल्हासनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे, मुलगा अल्पवयीन आहे हे माहीत असूनही त्याला त्याच्या वडिलांनी स्कूटर चालविण्यास दिली म्हणून पोलिसांनी आरोपी मुलासहित त्याच्या वडिलांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर _1 परिसरातील सी ब्लॉक या परिसरात असलेल्या कोणार्क रेसिडेन्सी या ठिकाणी बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मुख्य रस्त्यावर हा अपघात घडला. कोणार्क रेसिडेन्सी मध्ये राहणारे निरंजन हरेशलाल ठाकूर ( 62) हे रस्ता ओलांडून घराकडे जात असतांना सुझुकी बर्गमन या स्कूटरने भरघाव वेगाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा कार्तिक याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व स्कूटरने निरंजन यांना धडक दिली,या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत.
याप्रकरणी निरंजन यांचा मुलगा नितेश ठाकूर यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी कार्तिक गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासात कार्तिक हा अल्पवयीन असल्याने त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच मुलगा अल्पवयीन असून देखील तिच्या वडिलांनी त्याला स्कूटर चालविण्यास दिली म्हणून पोलिसांनी त्यांच्याविरोधात सुद्धा या अपघातात सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील हे करीत आहेत.