राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

अहमदनगर : सायकलिंगचे शहर अशी ओळख प्राप्त करत असलेल्या अहिल्यानगर शहरात सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (कॅम) यांच्या मान्यतेने आणिअहमदनगर सायकलिंग क्लबच्या सहकार्याने सायकलिंग असोसिएशन ऑफ अहमदनगर प्रथमच अहिल्यानगरीमध्ये ५व्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन २५ आणि २६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान करत आहे. पाथर्डी – अहिल्यानगर मार्गावरील चांदबीबी महाल बायपास लिंक रोडवर (चांदबीबी महाल ते वाळुंज) सुमारे १० किमी मार्गावर या स्पर्धा रंगणार आहेत.

या स्पर्धेमधून पुरी (ओरिसा) येथे ७ ते १० डिसेंबर दरम्यान होत असलेल्या २९व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात येणार आहे.

या ५व्या महाराष्ट्र राज्य राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा युथ (१२ ते १४ वर्षे), सब ज्युनिअर (१५ आणि १६ वर्षे), ज्युनिअर (१७ आणि १८ वर्षे) या वयोगट मुले आणि मुलींसाठी तसेच ईलीट पुरुष व महिला (१९ वर्ष आणि त्यापुढील) आणि २३ वर्षाखालील पुरुष (मेन अंडर२३ वयोगट) अशा एकूण नऊ वयोगटात होतील. इंडीव्युजल टाईम ट्रायल आणि मास स्टार्ट / रोड रेस अशा दोन प्रकारात स्पर्धक आपले कसब पणाला लावतील.

या राज्य आणि राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेमधून खेळाडू नोक-यांसाठी पात्र ठरत असतात, शासनाच्या इतर सर्व सवलती केवळ या स्पर्धेमधील कामगिरीवरुनच सायकलपट्टूंना मिळत असतात, नोक-या असणा-या खेळाडूंना बढती / पगारवाढ या स्पर्धेमधील कामगिरीवरुन ठरत असते म्हणून सायकलपट्टूंच्या दृष्टीने या स्पर्धा अत्यंत महत्वपूर्ण आहेत.

सूर्या थात्तू, प्रणव कांबळे,  मानसी महाजन, मणाली रत्नोजी, आभा सोमण (सर्व पुणे), तेजस धांडे (नागपूर), प्राजक्ता सुर्यवंशी, येगेश्वरी कदम (दोघी सांगली), मुस्तफा पत्रावाला (मुंबई), आकांक्षा म्हेत्रे (जळगांव), प्रणीता सोमण, राज कारंडे, अपूर्वा गोरे (अहिल्यानगर), पूजा दाणोले (कोल्हापूर), अदिती डोंगरे, वीरेंद्रसिंह पाटील, हरीश डोंबाळे, समरजीत थोरबोले, ऋतिका शेजुळ (सर्व पुणे क्रीडा प्रबोधिनी) आदी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलपट्टूंनी या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला आहे.

स्पर्धेच्या आयोजनासाठी मा. गौरव फिरोदीया यांच्या अध्यक्षतेखाली सीएफआयचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, कॅमचे सचिव प्रा. संजय साठे, अहमदनगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. साईनाथ थोरात, कॅमचे खजिनदार भिकन अंबे, मेहेर तिवारी यांची समिती काम करत असून तांत्रिक जबाबदारी आंतरराष्ट्रीय पंच सुदाम रोकडे, धरमेंदर लांबा आणि श्रीमती दीपाली पाटील सांभाळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *